Latest Marathi News | आयुक्तांचा दिवाळी धमाका; 10 रस्त्यांच्या पाहणी अहवालाचा फुटणार Bomb | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jalgaon Municipal Corporation News

Jalgaon : आयुक्तांचा दिवाळी धमाका; 10 रस्त्यांच्या पाहणी अहवालाचा फुटणार Bomb

जळगाव : शहरातील दहा रस्त्यांच्या कामाबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने नियुक्त केलेले मक्तेदार पाच कोटींतून रस्त्यांची कामे केल्याचा दावा करीत आहेत. आता महापालिका आयुक्त स्वत: रस्त्याची पाहणी करणार असून, त्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र देऊन थेट कार्यवाहीचा अहवाल मागविणार आहेत. दिवाळीनंतर थेट धमाका त्या करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत नागरिकांमध्ये रोष आहे. शासनाने शहरातील रस्त्यांसाठी तब्बल ४९ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यासाठी पाच कोटी रुपयांचा निधीही महापालिकेच्या माध्यमातून दिला आहे. या पाच कोटी रुपयांची कामे शहरातील कोणत्या रस्त्याची करण्यात आली आहेत, त्याचा अहवाल सादर करावा. त्यानुसार पुढील निधी मंजूर करण्यात येईल, असेही शासनाने महापालिकेला कळविले आहे.(Jalgaon police commissioner Survey of 10 roads take strict action against report give letter to social road construction department Jalgaon News)

हेही वाचा: Jalgaon Municipal Corporation : अधिकाऱ्यांची कमी,शासनाकडून मात्र होतेय बदली

महापालिकेचे ‘बांधकाम’ला पत्र

शासनाच्या आदेशानुसार आम्ही पाच कोटी रुपये दिले आहेत. त्या निधीतून आपण कोणती कामे केली आहेत याबाबत अहवाल द्यावा, असे पत्र आयुक्तांनी सार्वजनिक बांधकाम विभागास दिले आहे. मात्र बांधकाम विभागाने अद्यापही त्याबाबत कोणतीही माहिती महापालिकेस कळविली नाही. मात्र चार रस्त्यांची कामे झाली असल्याचे मक्तेदारांमार्फत तोंडी माहिती कळविण्यात आली आहे; परंतु यात लेखी काहीही नसल्याचे सांगण्यात आले.

आयुक्त करणार पाहणी

शासनाच्या ४२ कोटी रुपयांच्या निधीतून दहा रस्त्यांची कामे करण्यात यावीत, असे आदेश सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे मक्तेदारांना देण्यात आले होते. आपल्याला पाच कोटी रुपये प्राप्त झाले आहेत, त्यानंतर आपणास कोणताही निधी न मिळाल्याने आपण पाच कोटींच्या निधीतून चार रस्त्यांची कामे केल्याचा दावा मक्तेदाराने तोंडी केला आहे. त्यामुळे आता या पाच रस्त्यांचे काम तरी मक्तेदाराने केले किंवा नाही याची पाहणी आयुक्त स्वत: करणार आहेत.

हेही वाचा: Jalgaon Deputy Mayor Patil Statement : 1 कोटीच्या निधीतून अंतर्गत रस्त्यांची कामे करा

निधीसाठी अहवालाची मागणी

शहरातील काम केलेल्या चार रस्त्यांची पाहणी करून महापालिका आयुक्त सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र देणार आहेत. कामे झाली नसतील तर तातडीने मक्तेदारावर कारवाई करण्याबाबत त्या मागणी करणार आहेत. झाली असतील तर याबाबत आता लेखी अहवाल आपल्याला द्यावा, त्यानुसार पुढील निधीसाठी मागणी करण्याबाबत शासनाकडे पत्र पाठविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

"शहरातील दहा रस्त्यांची कामे करण्याबाबत आपण सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र दिले होते. त्यांनी मक्तेदाराकडून चार रस्त्यांची कामे केल्याची माहिती आपणास तोंडी प्राप्त झाली आहे. त्यानुसार आपण त्या रस्त्यांची पाहणी करून सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र देणार आहोत."

-डॉ. विद्या गायकवाड, आयुक्त, महापालिका, जळगाव

हेही वाचा: Gulabrao Patil Statement : आम्हाला बदनाम करण्याचे षडयंत्र रचले जातंय