Jalgaon Ramdev Wadi Accident Case: रामदेववाडी हिट ॲन्ड रन.. चौघांचा बळी अन्‌ संवेदनाशून्य यंत्रणा!

Accident News : पुण्यासारख्या महानगरात अशाच घटनेतून दोघा अभियंता तरुणांचा बळी जातो, तेव्हा कुठे लाजेपोटी आपली यंत्रणा जागे होऊन संशयितांना ताब्यात घेते, हा प्रकार म्हणजे तपास यंत्रणांच्या संवेदनाशून्य कारभाराचे संतापजनक द्योतकच म्हणावे लागेल
Ramdev Wadi Accident & Pune Porshe Accident
Ramdev Wadi Accident & Pune Porshe Accidentesakal
Updated on

जळगाव तालुक्यातील रामदेववाडीजवळ सत्ता व पैशांच्या मस्तीत असलेल्या तरुणांची भरधाव कार दुचाकीला उडवते. एक महिला, तिची दोन्ही चिमुकली मुले व भाचा, अशा चौघा निष्पापांचा बळी जातो. ग्रामस्थ आंदोलन करतात. मतदानावर बहिष्कार घालतात, पण झोपेचं सोंग घेणारी यंत्रणा जागे होत नाही.

शेवटी पुण्यासारख्या महानगरात अशाच घटनेतून दोघा अभियंता तरुणांचा बळी जातो, तेव्हा कुठे लाजेपोटी आपली यंत्रणा जागे होऊन संशयितांना ताब्यात घेते, हा प्रकार म्हणजे तपास यंत्रणांच्या संवेदनाशून्य कारभाराचे संतापजनक द्योतकच म्हणावे लागेल. (Jalgaon Ramdev Wadi Accident Case hit and run)

देशभरात, राज्यात व पर्यायाने खानदेशात चांगल्या, गुळगुळीत रस्त्यांचे नेटवर्क तयार झालेय आणि होतेय. या काही चौपदरी, तर काही विस्तीर्ण रस्त्यांवर वाहनांची गतीही कमालीची वाढलीय. अपघात नियंत्रणासाठी रस्त्यांची कामे, चौपदरीकरण, रुंदीकरण केले जात असले, तरी आता हे गुणवत्तापूर्ण रस्तेच वाहनांच्या गतीला आकर्षित करतात आणि अपघातांना निमंत्रण देणार ठरताय की काय, अशी शंका येते.

जळगाव-पाचोरा-चाळीसगाव या रस्त्याचेही कॉंक्रिटीकरण नुकतेच पूर्ण झालेय. त्यामुळे या रस्त्यावरील वाहनेही सुसाट धावताना दिसतात. महामार्गावर तुलनेने वाहतूक अधिक असते, म्हणून ‘स्पीड’शी प्रेम करणारे काही महाभाग जळगाव-शिरसोली रस्त्यावरून सुसाट वाहने दामटताना दिसतात. पैशांच्या मस्तीतील काही तरुण तर या सार्वजनिक रस्त्यांना ‘बापाची प्रॉपर्टी’ समजून वावरतात. हौशीखातर रेस लावून निष्पापांचा बळी घेण्यासही ही मंडळी मागेपुढे पाहत नाही.

रामदेववाडीजवळ ७ मेस सायंकाळी अशाच भरधाव कारच्या धडकेत राणी चव्हाण नामक आशासेविका, तिची दोन्ही मुले सोहम व सोमेश व भाचा अशा चौघांचा बळी गेला. हा अपघात म्हणजे सत्ता व पैशांचा माज असलेल्या मस्तवाल तरुणांच्या मुजोरीचे उदाहरण.

अपघात कसा घडला, कारमध्ये नेमके कोण होते, त्यापैकी कार कोण चालवीत होता, कारमध्ये आढळून आलेला गांजा या सर्व प्रश्‍नांची खरी उत्तरे योग्य व निष्पक्ष तपास झाला, तर त्यात निष्पन्न होतीलच, पण या अपघातानंतर त्यासंबंधी तपासात पोलिस यंत्रणे जी काही प्रक्रिया राबवली ती सर्वच बाजूंनी संशयास्पद म्हणावी लागेल.

अपघातानंतर लगेचच संतप्त ग्रामस्थांनी कारमधील तरुणांना बदडून काढले. ते त्यात जखमी होऊन त्यांना उपचारासाठी मुंबईला हलविण्यात आले. मात्र, त्यातही काहीतरी संशयास्पद होतेच. ग्रामस्थांनी १३ मेस झालेल्या लोकसभेच्या मतदानावर बहिष्कार घातला, तरी यंत्रणा सुस्त राहिली. (latest marathi news)

Ramdev Wadi Accident & Pune Porshe Accident
Ramdev Wadi Accident Case: आणखी एक बिल्डरपुत्र; शासकीय कंत्रांटदाराचा मुलगा अन मैत्रिणीचाही सहभाग

नाही म्हणायला जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षकांनी मतदान करण्यासाठी ग्रामस्थांना आवाहन केले. मात्र, ग्रामस्थ बहिष्कारावर ठाम राहिले. तब्बल तेराशे मतदारांनी मतदान केले नाही, त्याचे कुणालाच काही वाटले नाही, ही लोकशाहीदृष्ट्याही गंभीर बाब.

रामदेववाडी ‘हिट ॲन्ड रन’ प्रकरणात दोन आठवड्यांनंतर का होईना, जनमानसाच्या दबावामुळे संशयितांना पोलिसांनी अटक केलीय. हे प्रकरण आता न्यायालयात आहे. दोन्ही बाजूंनी कसा युक्तिवाद मांडला जातो, यापेक्षाही सरकारी पक्ष म्हणून पोलिस त्यात काय भूमिका घेतात, हे महत्त्वाचे आहे.

प्रकरणात आतापर्यंतच्या वाटचालीत पोलिस प्रशासनाची भूमिकाच वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. त्यामुळे त्याचा निष्पक्ष तपास होईल का? हा प्रश्‍न आहे. ‘जिथे रक्त सांडते.. तिथे तडजोड करीत नाही’, असे पोलिसांबाबत बोलले जायचे. आता तसं राहिलंय का? हाही प्रश्‍न आहे.

रामदेववाडी प्रकरणात आतापर्यंतच्या तपास प्रक्रियेत संवेदना गमावलेली पोलिस यंत्रणा पुढे किमान मृतांच्या आत्म्यांना शांती मिळेल, अन्‌ चिमुकल्यांच्या पिता, महिलेच्या पतीस न्याय मिळेल, या पातळीपर्यंत तरी तपास आणून ठेवेल, अशी अपेक्षा करुया.

Ramdev Wadi Accident & Pune Porshe Accident
Pune Porsche Accident: 3 लाख रुपये घेऊन आरोपीचे ब्लड सॅम्पल कचऱ्याच्या डब्यात फेकले; अमितेश कुमारांचा धक्कादायक खुलासा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com