Latest Marathi News | चौपदरीकरणाचे काम वर्षभरानंतरही पूर्ण होईना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Road Construction Work Incomplete

Jalgaon Road Construction : चौपदरीकरणाचे काम वर्षभरानंतरही पूर्ण होईना

जळगाव : महामार्गाचे चौपदरीकरण पूर्ण झाल्याचा दावा करत ऑगस्ट २०२१ पासून टोलवसुली सुरू झाली. टोलवसुली सुरू होऊन वर्ष उलटले, तरीही अद्याप चिखली ते तरसोददरम्यान अपूर्ण कामे पूर्ण झालेली नाहीत. कामे अपूर्ण असताना टोलवसुली सुरू झाली. अपूर्ण कामांमुळे अनेक ठिकाणी अपघात होताहेत.

नशिराबाद (जळगाव खुर्द)जवळील टोलनाक्याजवळील रेल्वे उड्डाणपुलावर एकेरी मार्ग असल्याने वाहनांच्या समोरासमोर धडक होऊन अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. असे असताना, अद्यापही महामार्ग प्राधिकरणाला अपूर्ण कामे पूर्ण करण्यास सवड मिळत नसल्याचे चित्र आहे. (Jalgaon Road Construction Work of quadrupling incomplete even after a year Jalgaon News)

हेही वाचा: Jalgaon Crime News : स्वयंपाक Gas Cylinderही चोरट्यांच्या Targetवर

धुळे-जळगाव विदर्भाला जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५६ च्या फागणे-तरसोद व तरसोद-चिखली या दोन टप्प्यांतील चौपदरीकरणाला एकावेळी सुरवात झाली. दोन वेगळ्या एजन्सीद्वारे ही कामे सुरू करण्यात आली. पैकी तरसोद-चिखली टप्प्यातील ६७ किलोमीटरचे काम वेल्स्पन या नामांकित एजन्सीने घेतले होते. हजार कोटींच्या या प्रकल्पाचे काम केवळ ८० टक्के पूर्ण झाले आहे. तीन-साडेतीन वर्षांपूर्वी हे काम सुरू करण्यात आले.

पुलांचे काम अपूर्ण

महामार्ग चौपदरीकरण करताना अनेक ठिकाणी कामे होणे बाकी आहे. त्यात नशिराबादजवळ (टोलनाक्यानंतर) सिमेंट फॅक्टरीजवळ रेल्वे उड्डाणपुलाचे काम बाकी आहे. या पुलावरून एकच बाजूने वाहतूक सुरू असून, दुसऱ्या बाजूला करण्यात आलेले भराव व डांबरीकरणाचे काम तांत्रिक कारण दाखवून बंद झाले होते. तेव्हापासून हे काम ठप्पच आहे. त्याठिकाणी ना यंत्रणा आहे, ना मजूर. तर अनेक चुकीच्या जागांवरून भुसावळ शहरात प्रवेश दिला आहे. यामुळे तेथे दररोज अपघात होतात.

टोलनाक्याजवळील पुलावर १५ जणांचा बळी

नशिराबाद टोलनाक्याजवळील रेल्वे उड्डाणपुलाचे काम अपूर्ण असल्याने एकाच बाजूने वाहतूक सुरू आहे. यामुळे दोन्ही दिशांनी येणारे वाहने पुलावर आल्यानंतर गर्दी होऊन वाहतुकीची कोंडी होते. या ठिकाणी रात्री वाहने अचानक आल्याने आतापर्यंत सुमारे १५ जणांचा बळी गेला आहे.

तरीही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला अजून जाग आलेली नाही. आता एकेरी मार्ग असताना, त्यावर दोन ते तीन फूट उंचीचे वेगवेगळे डिव्हायडर टाकले आहेत. त्यामुळे अधिकच वाहतुकीची कोंडी होऊन अपघाताच्या संख्येत वाढ झाली आहे.

हेही वाचा : मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....

हेही वाचा: Jalgaon News : STच्या भंडार विभागात 2 लाखांचा अपहार

...तरीही टोल सुरू

तरसोद-चिखली टप्प्यातील चौपदरीकरणाचे काम पूर्ण झालेले नाही. अनेक ठिकाणी रेल्वे उड्डाणपुलांची, साइड रोडची कामे अपूर्ण आहेत. काही उड्डाणपुलांवर केवळ पथदीपांचे खांब उभारले आहेत. पथदीप सुरू करण्यात आलेले नाहीत. महामार्गाला लागून ड्रेनेज व बसथांब्यांचेही काम अपूर्ण आहेत. तरीही ऑगस्ट २०२१ पासून टोल सुरू करण्यात आला आहे. रस्त्याचे काम अपूर्ण असताना टोल का द्यावा, अशा प्रश्‍न वाहनधारकांना पडला आहे. याबाबत आमदार संजय सावकारे यांनी अनेकवेळा जिल्हा नियोजन समितीच्या सभेत आवाज उठविला. तरीही महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी झोपेचे सोंग घेऊन आहेत.

दृष्टिक्षेपात काम...

टप्पा : तरसोद ते चिखली

अंतर : ६२.७ किलोमीटर

खर्च : सुमारे ९४८ कोटी

कामाची मुदत : ऑक्टोबर २०२१ पर्यंत होती

अजूनही काम पूर्ण झालेले नाही

मक्तेदार : वेल्स्पन इन्फ्रा

हेही वाचा: Jalgaon News : व्यवस्थापकाचा कोट्यवधींच्या सोन्यावर डल्ला; संशयिताच्या शोधार्थ पथके रवाना