जळगाव : रस्त्यांमुळे दळणवळणासह शेतकऱ्यांना फायदा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रस्त्यांमुळे दळणवळणासह शेतकऱ्यांना फायदा

जळगाव : रस्त्यांमुळे दळणवळणासह शेतकऱ्यांना फायदा

जळगाव : रस्ते हे रक्तवाहिन्यांप्रमाणेच अतिशय महत्त्वाचे असतात. याचा दळणवळणाला तर लाभ होतोच, पण शेतकऱ्यांनाही याचा फायदा होत असतो. जिल्ह्याच्या विकासासाठी रस्त्यांचा विकास परिणामकारक असल्यामुळे मतदारसंघातील रस्त्यांचे मजबुतीकरण, डांबरीकरण, काँक्रिटीकरणाला आपले प्राधान्य असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. रस्ते कामांचा उत्तम दर्जा राखण्यासाठी अधिकारी व ठेकेदार यांच्यात समन्वय महत्त्वाचा असून, कुणी कामात कुचराई केल्यास कारवाई करण्यात येईल, असा इशारादेखील पालकमंत्र्यांनी दिला.

तालुक्यातील आसोदा, ममुराबाद, विदगाव, नांद्रा या गावांमध्ये विविध विकासकामांचे भूमिपूजन केल्यानंतर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. पालकमंत्र्यांच्या हस्ते परिसरातील तब्बल साडेदहा कोटी रुपयांच्या कामांचा प्रारंभ आज करण्यात आला. यामुळे परिसरात विकासाचे नवीन पर्व सुरू झाले आहे. याच कार्यक्रमात पालकमंत्र्यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिवसेनेचा भगवा फडकावण्यासाठी सज्ज राहण्याचे कार्यकर्त्यांना आवाहन करून कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याचेही मंत्री पाटील यांनी या वेळी सांगितले.

प्रा. चंद्रकांत सोनवणे, जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, तालुकाप्रमुख राजेंद्र चव्हाण, शाखा अभियंता ए. व्ही. सूर्यवंशी, सुभाष राऊत, जे. के. महाजन, जिल्हा परिषद सदस्य पवन सोनवणे, पंचायत समिती सभापती ललिता पाटील, युवासेना जिल्हाध्यक्ष शिवराज पाटील, जनाआप्पा कोळी, रमेश पाटील, पंकज पाटील आदी उपस्थित होते.

हेही वाचा: काँग्रेसकडून उद्या देशभरात 'किसान विजय दिवस', कार्यक्रमांचं आयोजन

कार्यकर्त्यांच्या पाठीशी

मंत्री पाटील यांनी ठेकेदार आणि अधिकाऱ्यांमध्ये समन्वय असावे असे सूचित केले. ठेकेदारांनी रस्त्यांची कामे चांगले करावीत. आपले यावर लक्ष असून, कुणी कामात कुचराई केल्याचे आढळून आल्यास कारवाई करण्यात येईल, असा इशारादेखील त्यांनी दिला. तर लवकरच विविध कार्यकारी सहकारी संस्था, बाजार समित्या, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि पालिका निवडणुका येत असून, यात हातात झेंडा घेणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी या निवडणुका खूप महत्त्वाच्या आहेत. आपण केलेल्या कामांच्या बळावर सर्वच ठिकाणी शिवसेनेला यश मिळणार असून, यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे. आपण निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असल्याचे मंत्री पाटील यांनी सांगितले.

loading image
go to top