Jalgaon: राज्यात कपाशीच्या १५ लाख गाठींचे उत्पादन घटणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

cottone jalgaon

जळगाव : राज्यात कपाशीच्या १५ लाख गाठींचे उत्पादन घटणार

जळगाव : राज्यात यंदा अतिवृष्टीने कपाशी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे एकरी उत्पादनात कमालीची घट झाली आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी असलेला कपाशी उत्पादनाचा घास अतिवृष्टीने हिरावून नेला आहे. यामुळे यंदा बाजारात कपाशीची आवक कमी आहे. याचा परिणाम खानदेशसह राज्यात तयार होणाऱ्या कपाशीच्या गाठींवर होणार आहे.

राज्यात दरवर्षी ९० ते ९२ लाख कपाशीच्या गाठी तयार होतात. यंदा त्या केवळ ७५ लाख गाठी तयार होतील, असा अंदाज खानदेश जिनिंग प्रेसिंग असोसिएशनच्या बैठकीत व्यक्त करण्यात आला आहे. तर भारतात तीन कोटी ३० लाख ते तीन कोटी ६० लाख गाठींचे उत्पादन होईल.

हेही वाचा: विकिलिक्सचे संस्थापक ज्युलियन असांज तुरुंगात करणार लग्न

सोबतच खानदेशात दरवर्षी २३ ते २५ लाख कपाशीच्या गाठी तयार होतात. यंदा मात्र कपाशीची आवक कमी आहे. अनेक शेतकऱ्यांकडे कापूस नाही. जो आहे तो अत्यल्प आहे. यामुळे १५ लाख गाठींचे उत्पादन होईल, असा विश्वास आहे.

कापूस तेजीत

कपाशीला दरवर्षी चार हजार ५०० ते पाच हजार ६००, असा दर मिळतो. गतवर्षी जून महिन्यात सात हजारांचा दर मिळाला होता. यंदा मात्र आठ हजार ५०० ते नऊ हजारांपर्यंत कपाशीला दर मिळत आहे. हमीभावापेक्षा अधिकचा दर खासगी व्यापारी देत असल्याने केंद्र शासनाने ‘सीसीआय’ची केंद्रे यंदा सुरू केलीच नाहीत. यामुळे यंदा कापूस तेजीत आहे. असे असले तरी शेतकऱ्यांचे नुकसानही झाले आहे.

शंभर जिनिंग सुरू

खानदेशात सध्या शंभर जिनिंग प्रेसिंग मिल्स सुरू आहेत. जळगाव जिल्ह्यात ५५ ते ६० मिल्स सुरू आहेत. त्याद्वारे गाठी तयार होत आहेत.

हेही वाचा: मि. ५६ इंच घाबरलेत! चीनबाबत परस्परविरोधी दाव्यांवरून राहुल गांधींची टीका

गुजरातमध्ये मागणी अधिक

महाराष्ट्रातून कपाशीला गुजरात राज्यात अधिक मागणी आहे. गुजरातचे व्यापारी शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन कापसाची खेडा खरेदी करीत आहेत.

खानदेशात यंदा केवळ १५ लाख गाठी तयार होतील. जळगावला कॉटन टेस्टिंग लॅब सुरू झाली आहे. यामुळे जिनर्सचा फायदा होत आहे. कपाशीला चांगला भाव राहील.

-प्रदीप जैन, अध्यक्ष, खानदेश जिनिंग प्रेसिंग फॅक्टरी ओनर्स असोसिएशन

loading image
go to top