जळगाव : आला हिवाळा आरोग्य सांभाळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Cold

जळगाव : आला हिवाळा आरोग्य सांभाळा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जळगाव ः हिवाळ्याची चाहूल लागून सकाळी थंडीचा कडाका वाढला आहे. यामुळे सकाळी फिरणाऱ्यांची संख्या वाढली आहे. वातावरणातही गेल्या काही दिवसात बदल झाल्याने सर्दी, ताप, खोकल्याच्या रुग्ण संख्येत वाढ झाल्याचे खासगी डॉक्टरांकडे होणाऱ्या गर्दीवरून दिसून येत आहे.

हवामानातील बदलामुळे या व्याधी जडतात. नागरिकांनी हिवाळ्याचे चार महिने दररोज व्यायाम केला, योगासने करून योग्य आहारपद्धती ठेवली तर वर्षभर विविध व्याधींपासून सहज दूर राहता येते, असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे. हिवाळा अतिशय आनंददायक, रोमांचक असतो. थंडीचा कालावधी आरोग्याच्या दृष्टीने सर्वोत्तम मानला जातो. थंडीत प्रचंड भूक लागते, त्यामुळे आहारही चांगला राहतो. परंतु, हिवाळ्यात वातावरणात गारवा असल्याने विषाणूजन्य आजार होण्याची शक्यताही असते. शहरात वाढलेली धूळ आणि हवेतील प्रदूषण नागरिकांच्या आरोग्याला धोकादायक ठरू शकतात. यामुळे अनेकांना सर्दी, खोकला, घसा दुखणे, अंगदुखी यांसारख्या समस्या उद्भवतात. थंडीच्या दिवसात दम्याच्या रूग्णांमध्येही वाढ होते. त्यामुळे हिवाळ्यात आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. यासाठी नियमित व्यायाम, पौष्टिक आहाराचे सेवन करणे गरजेचे आहे. व्हिटॅमिन ‘डी’ अतिशय फायदेशीर आहे. अन्नपदार्थांसोबतच सूर्यप्रकाशातून व्हिटॅमिन ‘डी’ मिळत असते. पहाटे किमान २० मिनिटे कोवळ्या उन्हात उभे राहण्याचा प्रयत्न करावा. यामुळे हाडे आणि स्नायू बळकट राहण्यास मदत होते.

आठवड्याला १५० मिनिटे व्यायाम आवश्यक

शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासाठी दर आठवड्याला किमान १५० मिनिटे व्यायाम करणे आवश्यक आहे. योगा, एरोबिक्स अशाप्रकारे व्यायाम करणे अधिक फायदेशीर आहे. घरच्या घरी हा शरीरासाठी उत्तम व्यायाम आहे. नियमित व्यायाम केल्याने रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यात मदत होते.

हेही वाचा: Corona Update : राज्यात नवे 886 रुग्ण; मृत्युसंख्येत किंचित वाढ

भरपूर पाणी प्या

हिवाळ्यात त्वचेशी संबंधित समस्या दिसून येतात. यात त्वचा कोरडी पडणे, खाज सुटू शकते. याशिवाय ओठही कोरडे पडतात. अशावेळी भरपूर पाणी पिणे फायदेशीर ठरू शकते. याशिवाय त्वचेला कुठलाही संसर्ग होऊ नये, यासाठी त्वचेची स्वच्छता राखा, नियमितपणे आपले हात धुवा.

"हिवाळ्यात दमा, सर्दी, फ्लू, सांधेदुखी, खोकला, घसा खवखवणे यासारख्या आरोग्याच्या समस्या उद्‌भवतात. अशा समस्या जाणवत असल्यास दुखणे अंगावर न काढता तातडीने तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका."

डॉ. केतन महाजन, फिजीशिअन.

loading image
go to top