जळगाव : श्रद्धाभक्तीने मुलींनी केले मातेवर अंत्यसंस्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जळगाव : श्रद्धाभक्तीने मुलींनी केले मातेवर अंत्यसंस्कार

जळगाव : श्रद्धाभक्तीने मुलींनी केले मातेवर अंत्यसंस्कार

जळगाव (भुसावळ) : मोटारसायकल अपघात झाल्यामुळे उपचारासाठी पुणे येथे दाखल असलेल्या वडिलांच्या गैरहजेरीत श्रद्धा व भक्ती या चिमुकल्या मुलींची आई सौ. निशा पाटील यांचे निधन झाले. त्यामुळे मातेचा अंत्यविधी करण्याची जबाबदारी दोघी मुलींवर येऊन पडल्याने त्यांनी ती विधिवत पार पाडली. श्रद्धाभक्तीने मातेवर केलेल्या अंत्यसंस्काराच्या अत्यंत हृदयद्रावक प्रसंगामुळे उपस्थितांच्या डोळ्यात अश्रू तराळले. सौ. निशा पाटील यांच्या मृत्यूमुळे हळहळ व्यक्त होत आहे.

याबाबत माहिती अशी की ः भुसावळ येथील जामनेर रोडलगत असलेल्या संतधामजवळील दुर्गा कॉलनीतील रहिवासी निशा जगदीश पाटील यांना एप्रिलमध्ये असाध्य आजाराने घेरले. तेव्हापासून त्यांच्यावर विविध उपचार सुरू होते. परंतु दुर्दैवाने असाध्य आजार असल्याने सौ. निशा पाटील यांचा भाऊबीजेच्या दिवशी मृत्यू झाला. दरम्यान, त्यांचे पती डॉ. जगदीश पाटील वडिलांसोबत श्रीक्षेत्र मेहूण येथे मुक्ताईच्या दर्शनासाठी जात असताना त्यांचा अपघात झाला. अत्यंत गंभीर दुखापत असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना पुण्यातील रुग्णालयात नेण्यात आले. तेथे त्यांचे ऑपरेशन होऊन त्यांच्यावर यशस्वी उपचार करण्यात आले.

हेही वाचा: राज्यातील ग्रामपंचायतीच्या रिक्त जागांच्या पोट निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर!

रुग्णालयातच पत्नीच्या मृत्यूची वार्ता

ऑपरेशनच्या तिसऱ्याच दिवशी भुसावळ येथून दुःखद निरोप आला. काही महिन्यांपासून असाध्य आजाराने ग्रस्त असलेल्या निशा पाटील (वय ३३) यांचा मृत्यू झाला. अंत्यविधी व अंत्यसंस्कारासाठी पुणे येथून येणे शक्य नसल्याने त्यांच्या मुली श्रद्धा व भक्ती यांनी आईस अग्निडागसुद्धा दिला. हा सर्व अत्यंत हृदयद्रावक प्रसंग पाहून उपस्थितांचे डोळे अश्रूंनी डबडबले होते. अत्यंत सुस्वभावी असलेल्या निशा पाटील यांचे शिक्षण एम. ए. मराठी डी. एड्. झाले होते आणि यावर्षी त्यांनी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात एम. ए. शिक्षणशास्त्रसाठी प्रवेश घेतला होता. त्यांच्या अकाली जाण्याने पाटील परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असून श्रद्धा व भक्तीच्या डोक्यावरील आईच्या मायेचे छत्र हरपले आहे. महामंडलेश्वर जनार्दन महाराज, श्रीयज्ञेश्वर आश्रम मेहूणचे हभप शारंगधर महाराज यांच्यासह शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, अध्यात्मिक क्षेत्रातील विविध मान्यवरांनी डॉ. जगदीश पाटील यांच्या घरी भेट देऊन त्यांचे सांत्वन केले.

loading image
go to top