Latest Marathi News | करंजी पूरग्रस्त अद्यापही मदतीपासून वंचित | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Goverment Help

Jalgaon News : करंजी पूरग्रस्त अद्यापही मदतीपासून वंचित

पारोळा : ऑगस्ट महिन्यात झालेल्या ढगफुटीमुळे करंजी येथील शिवारात पाणी शिरल्याने तब्बल ४० ते ४५ घरे जमीनदोस्त झाली होती. त्यामुळे ते कुटुंब रस्त्यावर आले होते. ढगफुटीचे पाणी शेतात शिरल्याने लागवडीचे क्षेत्र पूर्णतः पाण्याखाली आले होते. त्याचा पंचनामा करण्यात आला होता. मात्र, त्यावेळी तुटपुंजी मदत पूरग्रस्तांना मिळाली होती.

चार महिने उलटूनही पूरग्रस्तांना भरीव मदत न मिळाल्याने पूरग्रस्तांची उपेक्षा होत असून, नूतन जिल्हाधिकाऱ्यांनी पूरग्रस्तांच्या भावना समजून त्यांना शासकीय मदत मिळवून द्यावी, अशी मागणी करंजी येथील सरपंच भय्यासाहेब रोकडे पाटील यांनी केली आहे.

अचानक झालेल्या ढगफुटीमुळे गरीब कुटुंबीयांचे संसार व घरगुती साहित्य पाण्याखाली गेले होते. परिणामी, अन्नधान्यासह कोंबड्याही दगावल्या होत्या. (Karanji flood victims still deprived of help Jalgaon News)

हेही वाचा: Jalgaon Crime News : ‘एसपी’ साहेब सांगा... आता खोटे कोण बोलतंय?

माजी पालकमंत्री डॉ. सतीश पाटील, रेडक्रॉस सोसायटी जळगाव, श्री साई हॉस्पिटलचे संचालक डॉ. संभाजीराजे पाटील यांनी गरजूंना संसारोपयोगी साहित्यवाटप करून त्यांना मदतीचा आधार दिला होता. मात्र, अद्यापपर्यंत शासनाकडून ठोस मदत न मिळाल्याने पूरग्रस्त कुटुंबीय शासनाची मदतीची आस धरून आहेत.

ती मदत तत्काळ मिळावी, अशी अपेक्षा ते व्यक्त करीत आहे. याबाबत सरपंच भय्यासाहेब रोकडे यांनी पूरग्रस्तांतर्फे नूतन जिल्हाधिकारी अमन मित्तल यांच्याकडे मागणी करून शासकीय मदत मिळावी, अशी विनंती केली आहे.

दरम्यान, सरपंच भय्यासाहेब रोकडे यांनी यापूर्वी तत्कालीन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना पूरग्रस्तांच्या मदतीसाठी निवेदन दिले होते. मात्र, अद्यापपर्यंत ४४ पैकी आठच शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत मिळाली असल्याचे भय्यासाहेब रोकडे यांनी सांगितले. नूतन जिल्हाधिकारी मित्तल यांनी आपल्यास्तरावर संबंधित विभागाला सूचना करून पूरग्रस्तांना मदत मिळवून न्याय द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

हेही वाचा : काय घडलं होतं उदयनराजेंच्या जलमंदिर पॅलेसमध्ये १९५२ साली??

हेही वाचा: Jalgaon News : गिरणेतील निर्माणाधीन पुलालगतचे पात्रही ओरबाडणे सुरू

"गावाचा प्रथम नागरिक या नात्याने प्रामाणिकपणे सरपंचपदाला न्याय देत पूरग्रस्तांना मदत मिळावी, यासाठी सप्टेंबर महिन्यात जिल्हाधिकाऱ्यांना प्रत्यक्ष भेटून पूरग्रस्तांची व्यथा मांडली होती. मात्र न्याय मिळाला नाही. आता नूतन जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी पूरग्रस्तांना न्याय मिळवून द्यावा, एवढीच अपेक्षा."

-भय्यासाहेब रोकडे, सरपंच, करंजी

हेही वाचा: Jalgaon Crime News : तरुणाच्या आत्महत्येतून दंगल