
Jalgaon News : धानोर शिवारात बिबट्याकडून दोन वासरूंचा ‘फडशा’
जळगाव : येथील मेहरूणजवळच असलेल्या धानोर शिवारात शनिवारी (ता. २५) पहाटे बिबट्याने (Leopard) दोन वासरूंचा फडशा पाडला. गेल्या दोन दिवसांपूर्वीही बिबट्यांनी एका वासरूचा फडशा पाडला होता. (leopard killed 2 calves in Dhanor Shivara near Mehrun on Saturday jalgaon news)
या परिसरात बिबट्याचा संचार वाढला असून, शेतकरी, नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. वन विभागाकडे बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची वारंवार मागणी करूनही बंदोबस्त होत नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. केव्हा बिबट्या येईल व हल्ला करेल, याची भिती शेतकऱ्यांना आहे.
धानोर शिवारात शेती सर्व्हे क्रमांक १७४ मध्ये हुसनोद्दीन पिरजादे यांचे शेत आहे. त्यात त्यांनी गोठा बांधला आहे. त्यात ४० गायी आहेत. गोठ्याला तारेचे कंपाउंडही केले आहे. मात्र, कंपाउंड तोडून बिबट्याने गेल्या मंगळवारी (ता. २१) मध्यरात्रीनंतर वासरूचा फडशा पाडला होता. शनिवारी पहाटेही वासरूवर हल्ला करीत त्याला उचलून नेले. तेथे त्याचा फडशा पाडला.
हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!
सकाळी शेतकरी शेतात गेल्यावर त्यांना वासरू फडशा पाडलेल्या अवस्थेत आढळून आले. त्यांनी वनरक्षक अजय रायसिंग व इतर सहकाऱ्यांना सोबत घेऊन घटनास्थळाचा पंचनामा केला.दरवर्षी या ठिकाणी बिबट्या येवून चार ते पाच गाई, वासरूंचा फडशा पाडतो.
आताही दोन वासरूंचा फडशा पाडला. शेतकरी, नागरिकांना बिबट्या रोज दिसतो. मात्र, ते सायंकाळ होण्यापूर्वीच घरी परततात. बिबट्याने नागरिकांवर हल्ला केला, तर नाहक नागरिकांचा जीव धोक्यात येईल.
यामुळे वन विभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. मात्र, वन विभाग त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. मागील वर्षी चार वासरूंचा फडशा पाडला होता. त्यापैकी दोघांची नुकसानभरपाई मिळाली. इतर दोघांची भरपाई मिळाली नाही, अशी नागरिकांची तक्रार आहे. याबाबत जळगाव वनक्षेत्र परीक्षेत्र अधिकारी नितीन बोरकर यांच्याशी संपर्क साधला असता, होऊ शकला नाही.