Jalgaon Crime News: पिस्तूलचा धाक दाखवत पेट्रोलपंपावर लूट; जानवे शिवारात मध्यरात्री थरार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jalgaon Crime news

Jalgaon Crime News: पिस्तूलचा धाक दाखवत पेट्रोलपंपावर लूट; जानवे शिवारात मध्यरात्री थरार

अमळनेर : धुळे रस्त्यावरील डांगर शिवारात असणाऱ्या पांडुरंग पेट्रोलपंपावर अज्ञात व्यक्तीने पिस्तूलचा धाक दाखवून सुमारे ३६ हजार ५०० रुपये लुटून नेल्याची घटना शुक्रवारी (ता. २४) पहाटे सव्वाबाराच्या सुमारास घडली. घटनास्थळी पोलिस अधीक्षकांनी भेट दिली.

डांगर शिवारात असणाऱ्या पांडुरंग पेट्रोलपंपावर शुक्रवारी (ता. २४) रात्री किशोर रवींद्र पाटील हे कार्यरत असताना सव्वाबाराच्या सुमारास चेहरा पूर्णपणे काळ्या रंगाच्या रुमालाने बांधलेला एक अनोळखी पुरुष आला. त्याने कार्यरत कर्मचाऱ्यांना झोपेतून उठविले. त्याच्याजवळ असलेल्या पिस्तूल दाखवून त्यांच्याकडे असलेले पेट्रोल-डिझेल विक्रीचे पैसे हिसकावून घेतले.

त्याच वेळेस एक चारचाकी चालक पेट्रोल भरण्यासाठी पंपावर आला असता लुटारूने त्याच्या चारचाकी गाडीच्या डिक्कीला लाथा मारून चालकास गाडी बाहेर निघण्यास भाग पाडले. त्याला बंदुकीचा धाक दाखवीत त्याच्या कानाखाली मारली.

त्याच्याजवळ असलेले पाकिट हिसकावून तो रस्त्याकडे गेला. रस्त्यावर त्याला घेण्यास दुचाकीवर घेण्यासाठी एक तरूण आला व ते दोन्ही दुचाकीवर बसून धुळ्याकडे रवाना झाले. त्यानंतर पैशांचा हिशोब केला असता नरेंद्र सोनसिंग पवार याच्याकडून १३ हजार २००, किशोर रवींद्र पाटील याच्याकडून १४ हजार ३०० व इंडिका कारमध्ये डिझेल टाकण्यासाठी आलेल्या संजय दिलीप भामरे याच्याकडून ९ हजार रुपये असा एकूण ३६ हजार ५०० रुपये अज्ञात चोरट्यांनी पिस्तूलचा धाक दाखवून चोरून नेले आहेत.

याबाबत नरेंद्र सोनसिंग पवार (रा.रणाइचे, ता. अमळनेर) याने अमळनेर पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस उपनिरीक्षक विकास शिरोळे पुढील तपास करीत आहेत.

अधिकारी घटनास्थळी
घटनेचे गांभीर्य पाहता पोलिस अधीक्षक एम. राजकुमार, अप्पर पोलिस अधीक्षक राकेश चोपडे, उपविभागीय अधिकारी राकेश जाधव, पोलिस निरीक्षक विजय शिंदे यांनी घटनास्थळाची पाहणी केली. या वेळी एलसीबीचे एक व स्थानिक पोलिसांचे एक अशी २ पथके संशयितांच्या मागावर पाठविण्यात आली आहेत.

टॅग्स :JalgaonCrime News