Gulabrao Patil: बेघरांच्या स्वप्नातील अमृत महाआवास योजना यशस्वी करा - पालकमंत्री गुलाबराव पाटील | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Gulabrao Patil

Gulabrao Patil: बेघरांच्या स्वप्नातील अमृत महाआवास योजना यशस्वी करा - पालकमंत्री गुलाबराव पाटील

जळगाव : स्वत:चे पक्के घर असावे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. घरकुलाच्या माध्यमातून हजारो ग्रामीण कुटुंबाचे हे स्वप्न पूर्ण होत आहे. बेघर आणि गरीब कुटुंबांना घरकुल बांधून देण्याच्या महत्त्वाची जबाबदारी आपल्यावर आहे. जबाबदारी ही संधी समजून प्रत्येकाने आत्मीयतेने काम केल्यास शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण होईल.

जल जीवन मिशन अंतर्गत जिल्ह्यातील नवीन पाणीपुरवठा योजना व रेट्रो फिटिंगची एकूण १ हजार ३५७ कोटी निधीच्या १ हजार ३९४ योजनांना प्रशासकीय मान्यता देऊन १०० टक्के योजनांचे टेंडर काढण्यात आले आहे. घरकुल लाभार्थ्यांना तत्परतेने नळ जोडणी नोंदणी करण्याची यंत्रणांनी दक्षता घेण्याचे आवाहन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज येथे केले.

हेही वाचा: Gulabrao Patil : समाजातील वंचित घटकाला मदतीचा हात द्या - गुलाबराव पाटील

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्यात २० नोव्हेंबर २०२२ ते ३१ मार्च २०२३ या कालावधीत ‘अमृत महाआवास अभियान’ राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने या जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन आज (ता.१७) जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात झाले. त्यावेळी पालकमंत्री पाटील बोलत होते. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन,

प्रभारी जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया, आमदार राजूमामा भोळे, आमदार मंगेश चव्हाण, अतिरिक्त सीईओ बाळासाहेब मोहन, उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्नेहल कुडचे, प्रांताधिकारी विनय गोसावी, विभागीय कार्यालयाचे प्रतिनिधी ओवेस सिद्दीकी आदी उपस्थित होती. प्रकल्प संचालक मीनल कुटे यांनी अमृत महाआवास अभियानाचे सादरीकरण केले. डॉ. आशिया यांनी प्रास्ताविक केले. राजेंद्र इंगळे यांनी सूत्रसंचालन तर किरण बेडीसकर यांनी आभार मानले.

गृहप्रवेश व प्रकाशन

चोरगाव (ता.धरणगाव) येथील दिव्यांग अशोक बुधा सोनवणे, पाळधी खुर्द (ता. धरणगाव) कोकिळा लक्ष्मण परदेशी, मालोद (ता.यावल) येथील महेरबान कुरबान तडवी यांना पालकमंत्री पाटील, ग्रामविकास मंत्री महाजन यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात घरकुलाची चावी देऊन गृहप्रवेश करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते ‘अमृत महाआवास अभियान’ यशोगाथाचे प्रकाशन करण्यात आले.

हेही वाचा: Gulabrao Patil | सुरेशदादांचे बोट पकडून आम्ही राजकारणात आलो : गुलाबराव पाटील

जिल्हास्तरीय प्रधानमंत्री आवास योजना पुरस्कार असे

सर्वोत्कृष्ट तालुका पुरस्कार- प्रथम : पारोळा, द्वितीय : भडगाव, तृतीय : मुक्ताईनगर (गटविकास अधिकारी).

सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत पुरस्कार- प्रथम : कुऱ्हे पानाचे (ता. भुसावळ), द्वितीय : सारोळे खुर्द (ता. अमळनेर), तृतीय : मनवेल (ता. यावल, सरपंच व ग्रामसेवक).

सर्वोत्कृष्ट क्लस्टर पुरस्कार- प्रथम : अडावद (ता.चोपडा), द्वितीय : ऐनपूर खिरवड (ता. रावेर), तृतीय : देवडी तळेगाव (ता. जामनेर, गटविकास अधिकारी).

जिल्हास्तरीय राज्य पुरस्कृत आवास योजना पुरस्कार- सर्वोत्कृष्ट तालुका पुरस्कार : प्रथम- जामनेर, द्वितीय- एरंडोल, तृतीय- पाचोरा (गटविकास अधिकारी).

सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत पुरस्कार- प्रथम- करंजी (ता. बोदवड), द्वितीय- कासोदा (ता.एरंडोल), तृतीय- करंज (ता. जळगाव, सरपंच व ग्रामसेवक).

सर्वोत्कृष्ट क्लस्टर पुरस्कार- प्रथम पाळधी खुर्द (ता.धरणगाव), द्वितीय- पहूरपेठ (ता.जामनेर), तृतीय- बामरुड (ता. पाचोरा,

सरपंच व ग्रामसेवक).

टॅग्स :Jalgaongulabarao patil