
देशातील उत्तर भारतात दिल्लीला केळी निर्यातीसाठी रेल्वे हा जलद व परवडणारा पर्याय आहे. त्यामुळे त्याचा उपयोग केला जात होता. तालुक्यातील सावदा, निंभोरा व रावेर येथील रेल्वे मालधक्यावरून केळीची वाहतूक केली जात असे.
सावदा (जळगाव) : अनेक वर्षानंतर येथील रेल्वेस्थानकाच्या मालधक्यावरून केळीच्या वॅगन भरण्यात येणार असून, त्या दिल्ली येथील आझादपूर मंडीत रवाना होणार आहेत, अशी माहिती मोठा वाघोदा येथील प्रगतिशील शेतकरी भरत सुपे यांनी दिली.
केळी उत्पादक शेतकरी भरत सुपे, डी. के. महाजन, प्रवीण धिंग्रा, नरेश शेठ आदी शेतकरी मिळून आठ डब्बे भरणार आहेत. त्यातून अंदाजे १८४ टन केळी रेल्वेद्वारे रवाना करणार आहेत.
देशातील उत्तर भारतात दिल्लीला केळी निर्यातीसाठी रेल्वे हा जलद व परवडणारा पर्याय आहे. त्यामुळे त्याचा उपयोग केला जात होता. तालुक्यातील सावदा, निंभोरा व रावेर येथील रेल्वे मालधक्यावरून केळीची वाहतूक केली जात असे. पण रेल्वे वॅगनचे भाडे हे वाढल्याने व अनेक प्रयत्न करूनही ते कमी न झाल्याने गेल्या दहा ते बारा वर्षांपासून सावदा, निभोरा व रावेर येथील केळी फळ बागायतदार युनियनने रेल्वेद्वारे केळी वाहतूक बंद केली होती. पण आता वरील शेतकऱ्यांनी पुढाकार घेऊन रेल्वेचे जे काही मालभाडे लागेल ते देऊ करून पुन्हा रेल्वेद्वारे केळीची वाहतूक करण्याचे ठरविले आहे. मंगळवारी सावदा येथील रेल्वे स्थानकाच्या मालधक्यावरून ही केळी रवाना होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची सोय होणार आहे.
संपादन ः राजेश सोनवणे