esakal | अपघातग्रस्त ठिकाणी तातडीने उपाययोजना करा : खासदार रक्षा खडसे
sakal

बोलून बातमी शोधा

raksha khadse

सध्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात महामार्गाची कामे सुरू आहेत. त्यामुळे वाहनचालकांना मार्गदर्शक ठरतील असे सूचनाफलक ठिकठिकाणी लावावेत. ज्या ठिकाणी वारंवार अपघात होतात अशा ठिकाणांची माहिती तातडीने संकलित करून तेथे आवश्यक त्या उपाययोजना राबवाव्यात.

अपघातग्रस्त ठिकाणी तातडीने उपाययोजना करा : खासदार रक्षा खडसे

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

जळगाव : जिल्ह्यातील महामार्गावर होणाऱ्या अपघातांवर नियंत्रण आणण्यासाठी अपघाती क्षेत्रांची माहिती संकलित करून उपाययोजना राबवाव्यात, असे निर्देश खासदार रक्षा खडसे यांनी दिले. 
येथील जिल्हा नियोजन भवनात संसदसदस्य रस्ता सुरक्षा समितीची बैठक खासदार खडसे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या वेळी त्या बोलत होत्या. पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार संजय सावकारे, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे उपस्थित होते. 
खासदार खडसे म्हणाल्या, की सध्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात महामार्गाची कामे सुरू आहेत. त्यामुळे वाहनचालकांना मार्गदर्शक ठरतील असे सूचनाफलक ठिकठिकाणी लावावेत. ज्या ठिकाणी वारंवार अपघात होतात अशा ठिकाणांची माहिती तातडीने संकलित करून तेथे आवश्यक त्या उपाययोजना राबवाव्यात. घोडसगाव येथे सर्व्हिस रोड तयार करावा. नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन चाळीसगाव येथे परिवहन विभागाचे उपकार्यालय सुरू करण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी तातडीने प्रस्ताव सादर करावा, अशा सूचना पालकमंत्री पाटील यांनी दिल्या. 
 
वर्षभरात ४७१ मृत्यू 
समिती सदस्य उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांनी प्रास्ताविकात जिल्ह्यात तरसोद फाटा टीव्ही टॉवर, शिव कॉलनी थांबा, चिंचखेड फाटा, धुळे-चाळीसगाव रस्ता या तीन ठिकाणी ब्लॅकस्पॉट निश्चित करण्यात आले आहेत. मागील वर्षी २०१९ मध्ये जिल्ह्यात ८३५ अपघातांत ४५४ मृत्यू झाले, तर ७७० व्यक्ती जखमी झाल्या. २०२० मध्ये ७५२ अपघातांत ४७१ मृत्यू झाले असून, ५१४ व्यक्ती जखमी झाल्या. मागील वर्षीपेक्षा अपघातांची संख्या १० टक्क्यांनी कमी झाली असून, मृत्यूंची संख्या ३.५ टक्के वाढली आहे. 
 
धोडमिसे ‘जीवनदूत’ 
अपघात झाल्यानंतर अपघातग्रस्ताला तातडीने मदत करून त्याचा जीव वाचविल्याप्रकरणी शासनाच्या जीवनदूत पुरस्कार भडगावच्या प्रशिक्षणार्थी तहसीलदार तृप्ती धोडमिसे (भाप्रसे) यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला.