‘विधी’ प्रवेशासाठी नानाविध अडचणी; प्रवेशासाठी विद्यार्थी अद्यापही प्रतीक्षेतच 

रईस शेख
Friday, 15 January 2021

लॉकडाउनमुळे शैक्षणिक क्षेत्राचे प्रचंड नुकसान झाले आहे. गेल्या आठ-नऊ महिने बंद असलेल्या महाविद्यालयांत गर्दी वाढू लागली असून, सोबतच नव्या प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थी अद्यापही प्रतीक्षेतच आहेत. 

जळगाव : विधिसेवा आणि कृषी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी राज्यस्तरीय वेबसाइटवर ऑनलाइन रजिस्ट्रेशन सुरू आहे. स्थानिक महाविद्यालयांना किंवा विद्यापीठास संपर्क करून उपयोग नाही. त्यांच्याकडून थेट वेबसाइट मुंबईहून हाताळण्यात येत असल्याचे सांगून हात वर केले जातात, तर शासकीय वेबसाइटवर येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी असलेल्या संपर्क क्रमांकावर संपर्कच होत नाही. 
लॉकडाउनमुळे शैक्षणिक क्षेत्राचे प्रचंड नुकसान झाले आहे. गेल्या आठ-नऊ महिने बंद असलेल्या महाविद्यालयांत गर्दी वाढू लागली असून, सोबतच नव्या प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थी अद्यापही प्रतीक्षेतच आहेत. 

तांत्रिक अडचणींचा सामना 
कोरोना संसर्गामुळे वाया गेलेले दहा महिन्यांचे शिक्षण ऑनलाइन झालेही, मात्र नव्या वर्षाच्या प्रवेशाला अडचणीचा सामना करावा लागत आहे. अभियांत्रिकी, कृषी, विधी अभ्यासक्रमासह इतर सर्वच अभ्यासक्रमांचे प्रवेश ऑनलाइन पद्धतीने होत आहेत. कृषी आणि विधी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी राज्य शासनाच्या स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेल, महाराष्ट्र स्टेट या (https://cetcelladmissions.mahait.org/Candidate/Dashboard/Dashboard) ऑनलाइन वेबसाइटवरून राज्यभरात लाखो विद्यार्थ्यांनी प्रवेश नोंदविला. सीईटी दिलेल्या विद्यार्थ्यांनाच या वेबसाइटवर प्रवेशाकरिता अर्ज करता येणार असल्याने सीईटी उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी ऑनलाइन पद्धतीने रजिस्ट्रेशन केले. 

अशा आहेत अडचणी 
या साइटवर शैक्षणिक दस्तऐवज अपलोड करण्यासाठी अगोदर ते (२ केबी)मध्ये कन्‍व्हर्ट करून अपलोड करावे लागतो. एकदा फायनल क्लिक केल्यानंतर येथे दुरुस्तीला वावच नसल्याने अनेक वेळा प्रयत्न करूनही उपयोग होत नाही. ऑनलाइन पद्धतीने कागदपत्रे छाननीअंती काही दस्तऐवज (लिव्हिंग, मार्कशीट) अस्पष्ट अपलोड झाल्याने अशा विद्यार्थ्यांचे प्रवेश थांबवून (ऑन होल्ड) ठेवण्यात आले असून, संबंधित अभ्यासक्रमाला प्रवेश मिळणार किंवा नाही, हेच मुळात कळेनासे झाले आहे. 
 
हेल्पलाइनवर ‘प्लीज वेट’ची कॅसेट 
संबंधित साइटद्वारे विद्यार्थ्यांना वेळेवेळी एसएमएस पाठविला जातो, डॅशबोर्ड तपासणीच्या सूचना केल्या जात असून, असंख्य प्रयत्न करूनही अस्पष्ट दस्तऐवज पुन्हा अपलोड करता येत नाही. वेबसाइटवर दिलेल्या हेल्पलाइन क्रमांकावर (८४४८४४०४५३) संपर्क केल्यानंतर तिकडून कृषीसाठी १ वर संपर्क करा, विधीसाठी २ वर संपर्क करा, मात्र संपर्क केल्यावर तिकडून ‘प्लीज वेट फॉर कॉल’ म्हणत थेट कॉलच कट होतो. कितीही वेळा संपर्क केला तरी तेच ते उत्तर येत असल्याने व दुसरा पर्याय नसल्याने विद्यार्थ्यांचा नाइलाज झाला आहे. 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi jalgaon news admission to legal and agricultural courses online problem