देहविक्रय करणाऱ्या इतक्‍या महिलांना मदतीचा हात 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 7 January 2021

पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील महिलांना मदत मिळाली आहे. लॉकडाउनमध्ये व्यवसाय पूर्णतः बंदमुळे देहविक्रय करणाऱ्या महिलांचे प्रचंड हाल झाले. या काळात आधार संस्थेने महिलांना तीन महिने रेशन दिले.

अमळनेर (जळगाव) : लॉकडाउन काळात व्यवसाय बंद राहिल्याने उपासमारीला तोंड देणाऱ्या देहविक्रय करणाऱ्या महिलांना शासनाने मदतीचा मोठा हात दिला आहे. प्रत्येकी महिलेला १५ हजार रुपये व शाळेत जाणारी मुले असलेल्या महिलेला २२ हजार ५०० रुपयांची मदत त्यांच्या बँक खात्यावर जमा केली आहे. 
पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील महिलांना मदत मिळाली आहे. लॉकडाउनमध्ये व्यवसाय पूर्णतः बंदमुळे देहविक्रय करणाऱ्या महिलांचे प्रचंड हाल झाले. या काळात आधार संस्थेने महिलांना तीन महिने रेशन दिले. मात्र, शासनाकडून मदतीची अपेक्षा होती. उच्च न्यायालयाने महिलांना मदतीसाठी शासनाला आदेश दिले. त्यानुसार राज्य सरकारने १५ हजार रुपये व २२ हजार ५०० रुपये जमा केले. 

यादी सादर केल्‍यानंतर मदत
लाभार्थींची यादी आधार बहुउद्देशीय संस्था व जळगावच्या गोदावरी फाउंडेशनतर्फे जिल्हा एड्स नियंत्रण कक्ष सामान्य रुग्णालयात पाठविली व त्यांच्यामार्फत महिला बालविकास विभागाकडे सुपूर्द केली. त्यांची संमतीपत्रे बँक खाते, आधारकार्ड, शिधापत्रिका तपशील दिला होता. ही मदत ऑक्टोबर, नोव्हेंबर व डिसेंबर या तीन महिन्यांसाठी प्रत्येकी महिलेला पाच हजारप्रमाणे एकूण रक्कम १५ हजार व शाळेत जाणारी अपत्य असणाऱ्या महिलांना महिन्याकाठी सात हजार ५०० प्रमाणे २२ हजार ५०० मिळाले. पहिल्या यादीत १७४ महिलांचा समावेश होता. यासाठी जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जिल्हा महिला बालविकास अधिकारी विजयसिंग परदेशी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागोजी चव्हाण, डीसीओ संजय पहूरकर, कायदेविषयक सल्लागार संध्या वानखेडे, आधार संस्थेच्या भारती पाटील, अश्विनी भदाणे, गोदावरी संस्थेचे काशीनाथ पाटील यांनी परिश्रम घेतले. 

उर्वरित महिलांनाही लाभ 
उर्वरित महिलांची मदतीची प्रक्रिया सुरू असून, उर्वरित महिलांनीही मदतीची विनंती केली असून, सर्व महिलांना लाभ मिळणार आहे. 

संपादन ः राजेश सोनवणे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi jalgaon news amalner goverment help in prostitution women lockdown