सैन्यदलात भरतीच्या आमिषाने फसवणूक; सहा महिन्यांपासून होती फरार 

रईस शेख
Tuesday, 22 December 2020

चाळीसगाव- वाकडी येथील अमोल पाटील फलटण येथे सैन्यभरतीचे प्रशिक्षण देणाऱ्या प्रशिक्षण ॲकॅडमीत कार्यरत होता. त्याच्या सोबत सचिन डांगे हादेखील सोबत कामाला होता. डांगेचे अमोल पाटील यांच्या वाकडी येथील घरी येणे- जाणे होते.

जळगाव : वाकडी (ता. चाळीसगाव) येथील बेरोजगार तरुणांना सैन्यदलात भरतीचे आमिष दाखवत त्यांची लाखो रुपयांत फसवणूक करण्यात आली होती. चाळीसगाव पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात सहा महिन्यांपासून फरारी संशयितास गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. 
चाळीसगाव- वाकडी येथील अमोल पाटील फलटण येथे सैन्यभरतीचे प्रशिक्षण देणाऱ्या प्रशिक्षण ॲकॅडमीत कार्यरत होता. त्याच्या सोबत सचिन डांगे हादेखील सोबत कामाला होता. डांगेचे अमोल पाटील यांच्या वाकडी येथील घरी येणे- जाणे होते. सैन्य व पोलिस भरतीसाठी तयारी करत असलेल्या तरुणांचा शोध घेत दोघांना शुभम पाटील (वय २५) भेटला. त्याला सैन्यदलात भरती करून देण्याचे आश्वासतन देत दोन लाख रुपये सचिनची पत्नी मोनिका डांगे यांच्या नावे करून आरटीजीएसद्वारे, तर चार लाख ४० हजार रेाख असे सहा लाख ४० हजार रुपयांत गंडा घातला होता. चाळीसगाव पोलिसांत ६ जूनला गुन्हा दाखल होताच इतर फसवणूक झालेल्या तरुणांची नावे समोर येऊन त्यात प्रकाश कुमावत (रा. मुंदखेडे, एक १ लाख ५० हजार), किरण कदम, चांभार्डी (पाच लाख), गणेश निकम, मुंदखेडे (दीड लाख) अशा एकूण चार तरुणांना १४ लाख ४० हजारांत गंडा घालून भामटे पसार झाले होते. 

महिला संशयित अटकेत 
गुन्हा दाखल होऊन चार महिन्यांनंतर (ऑक्टोबर) संशयित अमोल पाटील, गुलाब पाटील या बाप-लेकासह सचिन डांगे यालाही अटक झाली होती. मात्र, त्याची पत्नी आणि पैसा जिच्या बँक खात्यात वर्ग झाला ती, मोनिका डांगे गुन्हा घडल्यापासून फरारी होती. दाखल गुन्ह्यातील पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक किरणकुमार बगाले यांच्या पथकातील सहाय्यक फौजदार विजय पाटील, नरेंद्र वारळे, उपनिरीक्षक संपत अहेर, बिभीषण सांगळे, मालती बच्छाव यांच्या पथकाने मोनिका डांगे या महिला संशयितास पुणे येथून अटक केली. 

संपादन ः राजेश सोनवणे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi jalgaon news army fraud case police arrested