अपहरण झालेले भोपाळ- मुंबई विमानाचे जळगावात लँडींग

कैलास शिंदे
Sunday, 24 January 2021

भोपाळ येथून मुंबईला जाणाऱ्या विमानाचे काही जणांनी अपहरण केल्याचा संदेश प्राप्त झाला. त्याच वेळी इंधन भरण्यासाठी अपहरणकर्त्यांनी विमान जळगाव विमानतळावर उतरविण्यास पायलटला सांगितले.

जळगाव : भोपाळहून मुंबईकडे जाणाऱ्या विमानाचे अपहरण झाले.. अपहरणकर्त्यांनी त्यांच्या साथीदाराला तिहार तुरुंगातून सोडण्याच्या मागणीसह काही मागण्या केल्या. जळगाव विमानतळावर इंधन भरण्यासाठी विमान उतरविण्यात आले. त्यादरम्यान अपहरणकर्त्यांशी सुरक्षा व पोलिस अधिकाऱ्यांनी वाटाघाटी सुरू केल्या. विमानातील प्रवाशांना जेवण देण्याची विनंती अपहरणकर्त्यांनी मान्य केली. जेवण देणाऱ्या कर्मचाऱ्यांत पोलिस अधिकाऱ्यांना साध्या वेशात पाठवून अपहरणकर्त्यांना पकडून प्रवाशांची सुटका करण्यात आली, हे प्रत्यक्षात घडले नाही, मात्र याचे ‘मॉकड्रील’ शनिवारी (ता.२३) जळगाव विमानतळावर करण्यात आले. 
विमान अपहरण झाल्यानंतर काय? यासाठी सुरक्षा तसेच पोलिस विभाग किती सतर्क आहे, याची परीक्षा घेण्यात येते. हाच ‘विमान अपहरण सराव’ जळगाव विमानतळावर घेण्यात आला. भोपाळ येथून मुंबईला जाणाऱ्या विमानाचे काही जणांनी अपहरण केल्याचा संदेश प्राप्त झाला. त्याच वेळी इंधन भरण्यासाठी अपहरणकर्त्यांनी विमान जळगाव विमानतळावर उतरविण्यास पायलटला सांगितले. जळगाव धावपट्टीवर विमान उतरविण्यात आले. विमानतळ संचालकांनी तत्काळ दूरध्वनीद्वारे विमानतळ समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक, केंद्रीय तथा राज्य गुप्तचर यंत्रणा, वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा शल्यचिकित्सक, सार्वजनिक बांधकाम विभाग, वन विभाग व अन्य संबंधित विभागांना दिली. 

अशा ठेवल्‍या मागण्या
माहिती मिळताच सर्व संबंधित यंत्रणा तातडीने विमानतळावर पोचली. भारतीय विमान प्राधिकरणाचे जळगाव येथील मुख्य सुरक्षा अधिकारी सुमितकुमार तिवारी यांनी परिस्थितीचे गांभीर्य सांगून माहिती दिली. अपहरणकर्त्यांनी काही मागण्या ठेवल्या. त्यांच्या साथीदाराला तिहार तुरुंगातून मुक्त करावे, दहा हजार यूएस डॉलर तत्काळ द्यावे, विमानात लवकरात लवकर इंधन भरण्यात यावे, देशातून सुरक्षित बाहेर पडण्यासाठी पंतप्रधान यांच्याशी बोलणे करून देणे. या अपहरणकर्त्यांशी जिल्हाधिकाऱ्यांनी वाटाघाटी केल्या. बऱ्याच वेळ त्या चालल्या, विमानातील प्रवाशांना जेवण देण्यास अपहरणकर्त्यांना विनंती करण्यात आली, त्यांनी ती मान्य केली. त्याच वेळी जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक यांनी तत्काळ कृती योजना अमलात आणून साध्या वेशातील कमांडो जेवण पुरविणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये पाठवून अपहरणकर्त्यांना जेरबंद केले. 

दोन चालले नाट्य
जळगाव विमानतळावर हा अपहरणाचे सराव नाट्य तब्बल दोन तास चालले. या वेळी काही त्रुटी दिसून आल्याने सूचना देण्यात आल्या. सरावाचे संचलन जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक ए. चांडक, चंद्रकांत गवळी, सहाय्यक पोलिस अधीक्षक कुमार चिंधा, प्रशिक्षणार्थी पोलिस अधीक्षक नितीन गणपुरे, एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रताप शिखरे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, बांधकाम विभागाचे एस. आर. राऊत, वीज वितरणचे एन. बी. चौधरी, ‘एसआयटी’चे आर. आर. भागवत, ‘आयबी’चे राहुल मगर, ‘बीएसएनएल’चे विनोद महाजन, वन विभागाचे एस. के. शिसव, ‘एमएसएफ’चे जॉइंट डायरेक्टर एस. एन. पाटील आदी उपस्थित होते.  

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi jalgaon news bhopal mumbai aroplane kidnaping and jalgaon airport landing