तब्‍बल शंभर कोटींची जमीन घेतली फक्‍त तीन कोटींत

रईस शेख
Sunday, 24 January 2021

बीएचआर घोटाळ्यातील मुख्य संशयित सुनील झंवर याचा मुलगा सूरज यास पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी (ता.२२) जळगावच्या घरून सायंकाळी सातच्या सुमारास अटक करीत तत्काळ पुण्याच्या दिशेने रवाना झाले.

जळगाव : बीएचआर पतसंस्थेतील कोट्यवधींच्या घोटाळा प्रकरणातील मुख्य संशयित सुनील झंवर याचा मुलगा सूरज यास शनिवारी (ता. २३) न्यायालयात हजर केले असता २ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. न्यायालयाने तब्बल दहा दिवसांची पोलिस कोठडी दिल्यामुळे पोलिसांनी रिमांड नोटमध्ये खूपच महत्त्वपूर्ण मुद्दे दिल्याचे स्पष्ट होत आहे. 

बीएचआर घोटाळ्यातील मुख्य संशयित सुनील झंवर याचा मुलगा सूरज यास पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी (ता.२२) जळगावच्या घरून सायंकाळी सातच्या सुमारास अटक करीत तत्काळ पुण्याच्या दिशेने रवाना झाले. शनिवारी त्यास न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने २ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. तब्बल दहा दिवसांची पोलिस कोठडी दिल्याने पुणे आर्थिक शाखेच्या पथकाने रिमांड नोटमध्ये तपासाठी महत्त्वाचे मुद्दे दिले असल्याचे स्पष्ट आहे. दरम्यान, बीएचआर घोटाळ्यातील मुख्य संशयित सीए महावीर जैनचा जामीन अर्ज शुक्रवारी न्यायालयाने फेटाळून लावला असून, धरम सांखला, विवेक ठाकरे, सुजित वाणीच्या जामीन अर्जावर बुधवारी (ता.२७ ) निकाल येण्याची शक्यता आहे. 

संशयित सुनील झंवर यांच्या अडचणीत वाढ 
नाशिकमधील माडसांगवी येथील १०० कोटींची जमीन बीएचआर पतसंस्थेतील कोट्यवधींच्या घोटाळा प्रकरणातील मुख्य संशयित सुनील झंवर याने अवघ्या तीन कोटींत घेतली होती. या प्रकरणाची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गंभीर दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिले होते. त्यानंतर आता अपर महसूल सचिवांनी न्यायाधिकरणाने दिलेल्या निर्णयाविरोधात जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्तांना आव्हान याचिका दाखल करण्याचे आदेश दिल्याने संशयित झंवर यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. 

संपादन ः राजेश सोनवणे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi jalgaon news bhr patsanstha fraud case hundred carrore land only three carrore