सूरजने बोटावर नाचवले ‘बीएचआर’चे मुख्य कार्यालय 

रईस शेख
Monday, 25 January 2021

बीएचआर संस्थेतील गैरव्यवहार प्रकरणात मुख्य सूत्रधार अवसायक जितेंद्र कंडारे व व्यावसायिक सुनील झंवर फरारी असताना, शुक्रवारी (ता. २२) सुनीलचा मुलगा सूरज यास आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली. त्याच्या चौकशीतूनही आता अनेक गंभीर तथ्ये समोर येत आहेत. 

जळगाव : बीएचआर पतसंस्थेतील घोटाळ्यात नुकताच अटक झालेल्या सूरज झंवरला अतिरिक्त पोलिस कोठडी मिळावी, यासाठी १२ गंभीर कारणे तपासाधिकाऱ्यांनी न्यायालयात सादर केली. त्यात प्रामुख्याने बीएचआर सॉफ्टवेअर व निविदाप्रक्रिया एकमेकाला कशी लिंक केली?, कोणाच्या नावे निविदा स्वहस्ताक्षरात भरल्या, विविध कर्ज प्रकरणांत कशी तडजोड केली? यांसह आणखी गंभीर बाबी समोर आल्या आहेत. 
बीएचआर संस्थेतील गैरव्यवहार प्रकरणात मुख्य सूत्रधार अवसायक जितेंद्र कंडारे व व्यावसायिक सुनील झंवर फरारी असताना, शुक्रवारी (ता. २२) सुनीलचा मुलगा सूरज यास आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली. त्याच्या चौकशीतूनही आता अनेक गंभीर तथ्ये समोर येत आहेत. 

मुख्य कार्यालय केले लिंक 
बीएचआर सॉफ्टवेअर व मालमत्ता विक्रीसंदर्भातील निविदाप्रक्रिया त्याच्या कार्यालयात दिसण्यासाठी संशयित कुणाल शहाने सॉफ्टवेअर सूरजच्या कार्यालयात इन्स्टॉल केले होते व दोन्ही कार्यालय ऑनलाइन लिंक केली होती. त्यासंबंधी अधिक तपास सुरू आहे. 
कुणाल शहा याच्याकडून निविदांचे कोड सूरजला आधीच समजत होते. त्यानंतर सूरज सर्वांत जास्त रकमेची निविदा भरत होता. 

कर्ज प्रकरणांची तडजोड 
सूरज, त्याचा पिता सुनील, अवसायक कंडारे यांच्यासह इतर नमूद संशयित झंवरच्या खानदेश मिलमधील कार्यालयात येत होते. त्यांच्या मीटिंगमध्येच विविध कर्ज प्रकरणे तडजोड करण्यात आली आहेत. अशा प्रकारांबाबत सूरज झंवरला संपूर्ण माहिती असून, याबाबत तपास करणे आहे. 

नातलगांच्या नावाने निविदा 
श्री साई मार्केटिंग ॲन्ड ट्रेडिंग कंपनी जळगाव यांचे खात्यावरून निविदाधारकांचे बँक खात्यावर पैसे वर्ग केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. निविदा भरणारे सूरजच्या कार्यालयाशी संबंधित किंवा दूरचे नातेवाईक होते. अशारीतीने संशयित आरोपीने लिलावातील मालमत्ता स्वतःच विकत घेण्याचे उद्देशाने आपल्या वतीने इतर व्यक्तींना निविदा भरायला लावले व ही प्रक्रिया पारदर्शक असल्याचे भासविले आहे. याबाबत संशयितांकडे सखोल तपास करणे आहे. 
 
सीएचीही झंवरच्या कार्यालयात हजेरी 
तपासात असे निष्पन्न झाले, की महावीर जैन अटकेतील संशयित व सुनील झंवर यांच्या कार्यालयात येत होता व बीएचआरच्या कर्ज खात्यांचे खातेउतारे कृणाल शहाने इन्स्टॉल करून दिलेल्या सॉफ्टवेअरमधून घेऊन ती कर्जखाती सरळ व्याजाने व १२ टक्के व्याजाने हिशेब करून देत होता. यासंदर्भात अटक संशयितांकडे सखोल तपासासाठी आर्थिक गुन्हे शाखेने सूरजची अधिकची कोठडी मागितली. 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi jalgaon news bhr patsanstha fraud case tender process