ठाकरेंनी ठेवी मिळवून न देता पावती मॅचिंगमध्ये मारला डल्ला 

रईस शेख
Sunday, 17 January 2021

पुणे आर्थिक गुन्हे शाखेने अटक केलेल्या विवेक ठाकरे याच्या अर्जावर युक्तिवादास सुरवात झाल्यानंतर अॅड. वाडेकर यांनी सरकार पक्षाकडून बाजू मांडताना सांगितले,

जळगाव : बीएचआर घोटाळ्यातील संशयित आरोपी विवेक ठाकरे याच्या शिक्रापूरच्या गुन्ह्यात अटकपूर्व जामीन अर्जावर शनिवारी (ता.१६) दोन्ही पक्षांचा युक्तिवाद पूर्ण झाला. दुसरीकडे डेक्कनच्या गुन्ह्यात सुजीत वाणीच्या जामीन अर्जाबाबत सोमवारी (ता.१८), तर मंगळवारी (ता.१९) विवेक ठाकरे आणि सीए महावीर जैन यांच्या जामीन अर्जावर न्यायालय आदेश देणार आहे. मंगळवारपासून धरम सांखलाच्या जामीन अर्जावर युक्तिवादाला सुरवात होईल. 
पुणे आर्थिक गुन्हे शाखेने अटक केलेल्या विवेक ठाकरे याच्या अर्जावर युक्तिवादास सुरवात झाल्यानंतर अॅड. वाडेकर यांनी सरकार पक्षाकडून बाजू मांडताना सांगितले, की गुन्ह्याची सर्व कागदपत्रे सध्या डेक्कन पोलिसांकडे आहेत. त्यामुळे साक्षीदार तपासणी तसेच ठाकरेने एकूण किती जणांना फसवले?, याबाबत माहिती जाणून घ्यायची आहे. ठेवीदारांना ठाकरेच्या संघटनेने एक हजाराची पावती घेत सभासद केले आहे. पण ठेव मिळवून न देता पैशांचा अपहार केल्याची तक्रार असल्याचे त्यांनी युक्तिवादात सांगितले. 

वेगळे काही निष्‍पन्न होण्याची शक्‍यता
अॅड. उमेश सूर्यवंशी यांनी बचाव पक्षातर्फे युक्तिवाद करताना सांगितले, की डेक्कन पोलिसांनी याआधी ठाकरेची कस्टडी घेतलेली आहे. घर, ऑफिस येथून कागदपत्रही जप्त केले आहेत. पोलिसांनी जामनेर, जळगाव तसेच नाशिक येथील मालमत्तेचा तपास केला आहे. त्यामुळे आता शिक्रापूरच्या गुन्ह्यात वेगळे काहीही निष्पन्न होण्याची शक्यता नाही. गुन्हा पावत्या मॅचिंग करून दिल्या आहेत. ठाकरे यांनी फसवणूक केलेली नाही. बारामतीच्या ठेवीदाराची फसवणूक झाली होती. त्यांनी बारामती स्वतंत्र गुन्हा का दाखल केला नाही? ठाकरे यांनी पोलिस तपासात सुरवातीपासून सहकार्य केले आहे. परिणामी अटकपूर्व जामीन मंजूर करावा, अशी मागणी अॅड. सूर्यवंशी यांनी केली. 

मंगळवारी निकाल
दरम्यान, यावर आता मंगळवारी (ता. १९) निकाल येणार आहे. दुसरीकडे डेक्कनच्या गुन्ह्यात सुजीत वाणीच्या जामीन अर्जाबाबत सोमवारी, तर मंगळवारी श्री. ठाकरे आणि सीए जैन यांच्या जामीन अर्जावर न्यायालय आदेश देणार आहे. लेखापरीक्षक धरम सांखलाच्या जामीन अर्जावर युक्तिवादाला मंगळवारी सुरवात होईल. न्यायालयात आता नेमका कुणाचा जामीन होतो आणि कुणाचा फेटाळला जातो?, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.  

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi jalgaon news bhr patsantha fraud case thakrey bill maching