रेल्वेचा भुयारी मार्ग असुरक्षित; अंधारामुळे लुटमारीची शक्‍यता

railway subway
railway subway

भुसावळ (जळगाव) : शहरातील झेडटीसी परिसराला जोडणारा बोगदा काही दिवसांपासून नागरिकांसाठी खुला करण्यात आला. पूर्ण काम झालेले नसताना हा बोगदा खुला करण्यात आला असून, सध्या हा बोगदा अंधारात आहे. यामुळे येथे काळोख पसरला असून, अपघाताची दाट शक्यता आहे. बोगद्यात अंधार असल्यानेही अपघाताला आमंत्रण दिल्यासारखे आहे. त्यामुळे या बोगद्यात रात्री अंधार राहात असून चोरी, लुटमार, विद्यार्थिनी व महिलांसोबत अनुचित प्रकार घडण्याची शक्यता आहे. 
शहरातील झेडटीसी परिसर हा नागपूर रेल्वे लाइनच्या पलीकडे येतो. या रेल्वेमार्गावर तीन गेट असून, याठिकाणी रेल्वे प्रशासनातर्फे भुयारी मार्ग बनविण्यात आला आहे. याचा काही भाग सैनिकी केंद्राच्या परिसरात येत असल्याने तेथून भुयारी मार्गाला परवानगी नाकारल्याने हा मार्ग काही महिन्यांपासून बंद होता. मात्र, रेल्वे प्रशासनाने आता त्यांच्या हद्दीतील केवळ दोनच रेल्वे गेट ओलांडून भुयारी मार्ग सुरू केला आहे. याचे बहुतांश काम अद्यापही अपूर्ण असून, यात दिव्यांची व्यवस्थादेखील करण्यात आलेली नाही. हा परिसर शहराबाहेर येत असल्याने रात्री पूर्णतः शुकशुकाट पसरतो. त्यामुळे अंधाराचा गैरफायदा घेऊन चोरी तसेच इतर अनुचित प्रकार होऊ शकतात. 

वीज सुरू करण्याची मागणी 
रेल्वेने बांधलेल्या या बोगद्याचे अंतर दोनशे मीटरपेक्षा जास्त आहे. आतमध्ये अजूनही दिवे बसविण्यात आलेले नाहीत. त्यामुळे बोगद्यातील काळोखातून वाहने ये-जा करतात. अंधार असल्याने पुढची वाहने दिसत नाहीत. अचानक ब्रेक लावल्यास मागून आलेली वाहने धडकण्याची शक्यता असते. अंधारात वेग कमी-जास्त करण्याससुद्धा वाहनचालकांना अडचणी येत आहेत. रेल्वे प्रशासनाने याकडे वेळीच लक्ष देऊन बोगद्यातील दिवे सुरू करण्याची मागणी शिवसेनेने केली आहे. 

अधिकाऱ्यांची भेट घेणार 
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आमदार चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपजिल्हा संघटक विलास मुळे, उपजिल्हा प्रमुख श्याम श्रीगोंदेकर, उपजिल्हा प्रमुख प्रा. उत्तम सुरवाडे, तालुकाप्रमुख समाधान महाजन, विधानसभा क्षेत्रप्रमुख संतोष सोनवणे रेल्वे अधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत. 

..अन्यथा आंदोलन 
तालुक्यातील भुसावळ, वरणगाव व इतर परिसरात ये-जा करण्यासाठी हा मार्ग रेल्वे कर्मचारी, ऑर्डनन्स फॅक्टरी कर्मचारी, आर्मी जवान, विद्यार्थी, महिला व नागरिक वापरतात. काम अपूर्ण असताना बोगदा खुला करायला नको होता, वाहनचालकांची सुरक्षितता लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने त्वरित दिवे लावावेत; अन्यथा शिवसेनेतर्फे आंदोलन करण्यात येईल, असे प्रा. धीरज पाटील यांनी कळविले आहे. 

कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी रेल्वे प्रशासनाने त्वरित दिव्यांची व्यवस्था करावी, लवकरच शिवसेनेच्या तालुका स्तरावरील शिष्टमंडळाला सोबत घेऊन रेल्वे अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहे. 
- प्रा. धीरज पाटील, शिवसेना तालुका संघटक, भुसावळ 

संपादन ः राजेश सोनवणे
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com