म्‍हणूनच भाजपला ठोकला रामराम; प्रा. डॉ. अस्‍मिता पाटील यांनी सांगितले कारण

कैलास शिंदे
Tuesday, 29 December 2020

पक्षात प्रवेश केल्यानंतर आपल्याला ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’चे राज्य समन्वयक केले. परंतु पक्षाच्या नेत्यांनी राजकारणात नेतृत्व करण्याची संधी आपल्याला मिळूच दिली नाही. 

जळगाव : भारतीय जनता पक्षात सुरू झालेल्या अंतर्गत गटबाजीमुळे आपल्याला निवडणुकीच्या कोणत्याच मैदानात लढण्याची संधी मिळाली नाही. आपल्या गटाच्याच कार्यकर्त्यांना पुढे नेण्याच्या नेत्यांच्या धोरणामुळे आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना रणांगणात उमेदवारी मिळत नाही. आगामी काळातही भाजपत आपल्याला संधी मिळण्याची शक्यता नसल्याने आपण भारतीय जनता पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे, असे मत प्रा. डॉ. अस्मिता पाटील यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केले. 
याबाबत प्रा. डॉ. अस्मिता पाटील यांनी ‘सकाळ’शी चर्चा केली असता त्या म्हणाल्या, आपण एक अपेक्षा ठेवून भाजपत प्रवेश केला होता. मात्र ती पूर्ण झाली नाही. त्यामुळे आपण राजीनामा दिला आहे. पक्षात प्रवेश केल्यानंतर आपल्याला ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’चे राज्य समन्वयक केले. परंतु पक्षाच्या नेत्यांनी राजकारणात नेतृत्व करण्याची संधी आपल्याला मिळूच दिली नाही. 

अमोल शिंदेंना ताकद, मला उमेदवारीही नाही 
विधानसभा निवडणूक ‘युती’तर्फे लढण्यात आली. या मतदारसंघात आपण पूर्ण तयारी केली होती. आपण संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला होता. पक्षातर्फे आपल्याला उमेदवारी मिळण्याची अपेक्षा होती. विधानसभेत भाजप-सेनेची युती झाली, सेनेच्या वाट्याला हा मतदार संघ गेला. परंतु जिल्ह्यातील काही विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या उमेदवारासमोर भाजपने काही अपक्ष उमेदवार उभे केले होते, हे आता सर्वांनाच माहीत झाले आहे, ते कोठेही लपून राहिलेले नाही. त्याच वेळेच अपक्ष म्हणून पाचोरा विधानसभेतून अमोल शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली. त्या वेळी आपणही मागणी केली होती. आपण तर मतदारसंघ पिंजून काढला होता. शिवाय नवीन उमेदवार म्हणून आपल्याला जनतेने स्वीकारलेही असते. मात्र भाजपच्या नेत्यांनी त्या वेळी अमोल शिंदे यांना संधी दिली. त्यांच्या पाठीशी पूर्ण ताकद उभी केली. 

अंतर्गत गटबाजीचा फटका 
भारतीय जनता पक्षात नेत्यांच्या अंतर्गत गटबाजीचाही आपण बळी ठरल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. त्या म्हणाल्या, भाजपमध्ये नेतृत्वाच्या गटबाजीचे लेबल लावले जाते. त्यामुळे सर्वसामान्य कार्यकर्त्यांचे नुकसान होते. आपण खडसे यांच्या कार्यकाळात प्रवेश केल्यामुळे आपल्यावर त्यांच्या गटाचे असल्याचे म्हटले गेले. जो पक्ष आपल्याला निवडणुकीत संधी देईल त्याच पक्षात आपण प्रवेश करणार असल्याचे प्रा. पाटील यांनी सांगितले. 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi jalgaon news bjp member resigned asmita patil