esakal | पश्‍चिम बंगालमधील हिंसाचाराविरुद्ध भाजपचे धरणे
sakal

बोलून बातमी शोधा

bjp stand

पश्‍चिम बंगालमधील हिंसाचाराविरुद्ध भाजपचे धरणे

sakal_logo
By
टीम ई सकाळ

जळगाव : पश्चिम बंगालमधील निवडणुकीच्या निकालानंतर उसळलेल्या हिंसाचारात तृणमूलच्या गुंडांनी भाजप (BJP) कार्यकर्त्यांच्या हत्या, त्यांना मारहाण, जाळपोळ सुरु केली आहे. प. बंगालमध्ये (West bengal) लोकशाहीची हत्त्या झाली असून त्याच्या निषेधार्थ भाजपने आज राज्यव्यापी धरणे आंदोलन केले. जळगावातही तीव्र निदर्शने करण्यात आली. (bjp's stand against violence in west bengal)

या हिंसाचारामागे नव्याने सत्तारूढ झालेल्या तृणमूल काँग्रेसचा हात असून संपूर्ण पश्चिम बंगाल राज्यात सूडबुद्धीने कट रचून भाजप कार्यकर्त्यांची हत्या, महिलांवर अत्याचार, सर्वसामान्य जनतेचे नुकसान, पक्षाचे कार्यालय जाळपोळ करून दहशत निर्माण केली आहे. या हिंसाचाराविरुद्ध जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश भोळे (राजूमामा), महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांच्या नेतृत्वात धरणे आंदोलन करण्यात आले. महानगराच्या ९ मंडलात व युवा मोर्चा महिला, ओबीसी, व्यापार, केमिस्ट अशा विविध आघाड्यांतर्फे धरणे आंदोलन करण्यात आले.

हेही वाचा: पाचोऱ्यात रात्रीचा थरार..एटीएम चोरण्याचा चोरांचा प्रयत्न फसला

जोरदार घोषणाबाजी

दाणाबाजार चौकात ममता बॅनर्जी यांच्या निषेधार्थ तीव्र घोषणाबाजी करण्यात आली. यात स्थायी सभापती राजेंद्र घुगे पाटील, जिल्हा पदाधिकारी विशाल त्रिपाठी, डॉ.राधेश्याम चौधरी, महेश जोशी, नितीन इंगळे, प्रदीप रोटे, सुशील हासवाणी, उज्वला बेंडाळे, अमित भाटीया, माजी महापौर भारती सोनवणे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.

हेही वाचा: आमच्‍यासाठी सर्व रूग्‍ण मायबाप; डॉक्‍टरांचे भावनिक आवाहन

एरंडोल भाजपतर्फे निषेध

एरंडोल : पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर झालेल्या हिंसाचाराचा भारतीय जनता पक्षातर्फे निषेध करण्यात आला. भाजप पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार अर्चना खेतमाळीस यांना निवेदन देण्यात आले. भाजपतर्फे बंगालमधील हिंसाचाराचा निषेध करण्यात आला असून, हिंसाचार करणाऱ्या गुंडांविरुद्ध कडक कारवाई करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे. या वेळी माजी नगराध्यक्ष रवींद्र महाजन, भाजप ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अशोक चौधरी, भाजप युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष प्रशांत महाजन, भाजपचे तालुका सरचिटणीस अमोल जाधव, वाल्मिक सोनावणे, अजेंद्र पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. या वेळी पदाधिकाऱ्यांनी पश्चिम बंगाल सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली.