चाळीसगावचे वनोद्यान होणार खुले

आनन शिंपी
Monday, 1 March 2021

मध्यंतरीच्या काळात निधीअभावी काम बंद होते. मात्र, आमदार मंगेश चव्हाण यांनी देखील सततचा पाठपुरावा केल्याने वनोद्यानाच्या कामासाठी भरघोस निधी मंजूर झाला. अटल आनंद घन वन योजनेतून सुमारे ३० हजार वृक्षांची लागवड करुन त्यांचे जतन करण्यात येत आहे.

चाळीसगाव (जळगाव) : तालुक्यातील जनतेला उत्सुकता लागून असलेल्या शहराजवळच्या बिलाखेड शिवारातील स्वर्गीय उत्तमराव पाटील यांच्या वनोद्यान येत्या २१ मार्चला जागतिक वन दिनाचे औचित्य साधून सर्वसामान्य नागरिकांसाठी खुले होणार आहे. या वनोद्यानातील विविध कामांची माहिती आमदार मंगेश चव्हाण यांनी घेऊन सामाजिक वनीकरण विभागाच्या अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना केल्या. 
येथील एमआयडीसी जवळील बिलाखेड शिवारात सुमारे सात हेक्टर जागेत २०१६ मध्ये वनोद्यान व हायटेक रोपवाटिका उभारण्यास सुरुवात झाली होती. सध्या या उद्यानाचे काम अंतिम टप्यात आले असून हे काम पूर्णत्वास येण्यासाठी तत्कालीन आमदार व विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांनी पाठपुरावा केला होता. मध्यंतरीच्या काळात निधीअभावी काम बंद होते. मात्र, आमदार मंगेश चव्हाण यांनी देखील सततचा पाठपुरावा केल्याने वनोद्यानाच्या कामासाठी भरघोस निधी मंजूर झाला. अटल आनंद घन वन योजनेतून सुमारे ३० हजार वृक्षांची लागवड करुन त्यांचे जतन करण्यात येत आहे. हा प्रकल्प शहराजवळच असल्याने यातून मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनची निर्मिती होईल. आमदार मंगेश चव्हाण यांनी सामाजिक वनीकरण विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत वनोद्यानाची नुकतीच पाहणी करुन सुरु असलेल्या कामांचा आढावा घेतला. येत्या २१ मार्चला जागतिक वन दिनी वनोद्यान सर्वसामान्यांसाठी खुले केले जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. यावेळी विभागीय वन अधिकारी आय. सी. शेख, वनपरिक्षेत्र अधिकारी संजय साळुंखे यांच्यासह सामाजिक वनीकरण विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. 

योजनेला शासनाची मान्यता 
एकीकडे भारतीय जनता पक्षाच्या काळातील बऱ्याच योजनांना महाविकास आघाडी सरकार स्थगिती देत आहे. मात्र, महत्वाकांक्षी व पर्यावरणपूरक अशा उत्तमराव पाटील वनोद्यान निर्मिती योजनेला विद्यमान राज्य शासनाने सन २०२२- २३ पर्यंत सुरु ठेवण्यास मान्यता दिली आहे. तसा शासन निर्णय ३ फेब्रुवारी २०२१ ला शासनाने काढला आहे. एवढेच नव्हे तर या योजनेसाठी निधी देखील उपलब्ध करून दिला आहे. यासाठी आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह राज्यातील सर्वपक्षीय आमदारांनी राज्य शासनाकडे मागणी केली होती. 

वनोद्यानातील सुविधा 
या वनोद्यानात रनिंग ट्रॅकसह पाण्याचा तलाव, ओपन जिम, नक्षत्र वन, आयुर्वेदिक गार्डन, आकर्षक बगीचा, विविध प्राण्यांचे पुतळे, दोन पॅगोडा, निसर्ग वाचन केंद्र, भव्य प्रवेशद्वार, जागोजागी विसाव्यासाठी बैठक व्यवस्था आदींचा समावेश आहे. यातील बरीचशी कामे पूर्णत्वास आली आहेत. या वनोद्यानामुळे चाळीसगावच्या लौकीकात मोलाची भर पडणार आहे. 

दर्जेदार कामाचा आग्रह 
दरम्यान, आमदार मंगेश चव्हाण यांनी वनोद्यानाची पाहणी करताना उद्यानाला संरक्षण म्हणून असलेले जाळीचे कुंपण ठिकठिकाणी तुटलेल्या अवस्थेत दिसून आले. त्यामुळे हे काम निकृष्ठ दर्जाचे झाल्याचे सांगून त्यांनी संबंधित ठेकेदाराला याबाबत योग्य त्या सूचना करण्यास अधिकाऱ्यांना सांगितले. यापूर्वी उद्यानाच्या सभोवताली कच्चा रस्ता तयार करण्यात आल्याने पुन्हा त्याच कामासाठी निधी खर्च करण्यात येत असल्याने हा रस्ता अधिक टिकाऊ कसा होईल याकडे देखील लक्ष देण्याची सूचना आमदार चव्हाण यांनी करुन हे काम टिकावू व दर्जेदार कसे होईल, याकडे लक्ष द्यावे असेही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सांगितले. 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi jalgaon news chalisgaon forest park will be open