पाटणादेवी जंगलातील थरार; वाळू चोरट्याने चालविले वन कर्मचाऱ्यावर ट्रॅक्टर, सुदैवाने पायावर निभावले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

valu chori

पाटणादेवी जंगलातील थरार; वाळू चोरट्याने चालविले वन कर्मचाऱ्यावर ट्रॅक्टर, सुदैवाने पायावर निभावले

चाळीसगाव (जळगाव) : पाटणादेवी जंगलात (Patnadevi forest aria) गस्त घालणाऱ्या वन विभागाच्या कर्मचाऱ्याच्या अंगावर डोंगरी नदीपात्रातून वाळूची अवैधरीत्या तस्करी करणाऱ्याने भरलेले ट्रॅक्टर चालवून ठार मारण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने कर्मचाऱ्याच्या पायावरून ट्रॅक्टर नेल्याने (Tractor drive) अनर्थ टळला. मात्र वन कर्मचारी जखमी झाला असून, त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या गंभीर प्रकारामुळे वाळू तस्करांची मुजोरी वाढल्याचे दिसून येत आहे. याबाबत कसून चौकशी करून वन कर्मचाऱ्याला ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या वाळू चोरट्यांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी होत आहे. (tractor on forest worker driven by sand thief)

हेही वाचा: वाळूचोरट्याने पोलिस अधिकाऱ्यास पटकले; गिरणापात्रात भिडले

पाटणादेवी जंगलातील डोंगरी नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर वाळू आहे. जंगलातील गायमुख परिसरातून वाळूची सर्रास चोरी होते. या भागात गेल्या अनेक वर्षांपासून काही वाळू तस्कर वन विभागाच्या काही अधिकारी व कर्मचाऱ्यांशी आर्थिक हितसंबंध प्रस्थापित करून मोठ्या प्रमाणावर वाळूचा अवैधरीत्या उपसा करतात. रात्री बाराच्या सुमारास वनरक्षक अजय महिरे, गोरख राठोड, राजाराम चव्हाण, श्री. राठोड, मुलचंद राठोड हे जंगलात गस्त घालत असताना त्यांना ट्रॅक्टरचा आवाज आला.

ट्रॅक्‍टर अंगावरच घातले

आवाजाच्या दिशेने जात असताना त्यांना वाळूने भरलेले ट्रॅक्टर शिवापूर गावाकडे जाताना दिसले. या कर्मचाऱ्यांनी ट्रॅक्टर अडविण्याचा प्रयत्न केल्यानंतर चालकाने ट्रॅक्टर न थांबवता, कर्मचाऱ्यांच्या चक्क अंगावर चालविले. सुदैवाने वन कर्मचारी सावध झाल्याने अनर्थ टळला. हा थरार सुरू असताना लालचंद चव्हाण (वय २८) यांच्या पायावरून ट्रॅक्टरचे चाक गेल्याने ते जखमी झाले. जखमी अवस्थेत श्री. चव्हाण यांना सोबतच्या सहकाऱ्यांनी तातडीने चाळीसगावला डॉ. परदेशी यांच्या दवाखान्यात दाखल केले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

हेही वाचा: अक्षयतृतीयेला बालविवाह होण्याचे संकेत?

वाळूचा उपसा सुरूच

वन्यजीव अधिनियम १९२७ नुसार, अभयारण्य क्षेत्रातून साधी काडीदेखील हलविण्याची परवानगी नाही. असे असताना अवैधरीत्या वाळूचा मोठ्या प्रमाणावर उपसा सुरू आहे. अगोदरच जंगलात पाण्याचे दुर्भिक्ष्य आहे. जंगलातील वन्यप्राण्यांना पाणी मिळावे, यासाठी वन विभागानेच कृत्रिम पाणवठे उभारले आहेत. वास्तविक, जंगलातील नदीपात्रातील वाळूमुळे पाणी टिकून राहते. त्यामुळे जंगलातील वाळू सुरक्षित राहणे गरजेचे आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी गिरणा नदीपात्रातून वाळू उपशावर बंदी घातल्यानंतर वाळू तस्कर अभयारण्यातून वाळूची चोरी करतात. वन विभागातील अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांच्या सहभागाशिवाय वाळू चोरणे शक्य नाही. सध्या कडक उन्हाळा असतानाही जंगलातून वाळूची चोरी सुरू आहे.

वाळू चोरांमुळे जंगलाला आग लागण्याचा धोका

सध्या जंगलात आग लागण्याचे प्रकार वाढले आहेत. त्याला वाळूची चोरी करणारे देखील कारणीभूत आहेत. बऱ्याचदा ट्रॅक्टरचालक बिडी, सिगारेट ओढतात. जंगलात कुठेही फेकल्यानंतर आग लागण्याचा धोका असतो. याशिवाय ट्रॅक्टरमध्ये जादा क्षमतेने वाळू भरल्यानंतर ट्रॅक्टरचे एक्सिलेटर वाढवले, की सायलेन्सरमधून आगीच्या ठिणग्या पडू शकतात. त्यामुळेदेखील आगीचा धोका असतो. एकूणच वाळूच्या या अवैध उपशामुळे वन्यजीवांच्या अधिवासाला निर्माण झालेला धोका लक्षात घेता वाळू तस्करांवर कठोरातील कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

घडलेल्या प्रकाराची माहिती घेतली असून, त्यादृष्टीने चौकशी सुरू केली आहे. संबंधितांना गुन्हा दाखल करण्याचेदेखील आदेश दिले आहेत. त्यामुळे यात जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर नियमानुसार योग्य ती कारवाई निश्‍चितपणे केली जाईल.

- राहुल शेळके, वन परिक्षेत्र अधिकारी, कन्नड

Web Title: Marathi Jalgaon News Chalisgaon Patnadevi Tractor On Forest Worker Driven Sand

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top