
लासूर येथील ग्रामस्थ प्रदीप ऊर्फ आबा जगन्नाथ माळी मंगळवारी (ता. ५) चोपडा पोलिस ठाण्यात आला. त्याने सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप अराख यांना लासूर गावातील खुनाची माहिती दिली.
चोपडा (जळगाव) : लासूर (ता. चोपडा) येथील एकवीस वर्षीय विवाहिता घरात एकटी असताना मद्यपी तरुण तिच्या घरात शिरला व थेट शेजारी झोपला. त्या वेळी पाळतीवर चार ते पाच जणांनी या तरुणाला लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण केली अन् त्यात त्याचा मृत्यू झाला होता. रतिलाल जगन्नाथ माळी असे या मृत तरुणाचे नाव असून, या प्रकरणी चोपडा पोलिसांत गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी चार संशयितांना अटक केली आहे. दरम्यान, या प्रकरणात पोलिसांनी पाचव्या संशयितास अटक केली असून, तो रतिलालचा सख्खा भाऊच असल्याचे निष्पन्न झाले आहे. विशेष म्हणजे, त्यानेच या घटनेची फिर्याद दिली होती.
लासूर येथील ग्रामस्थ प्रदीप ऊर्फ आबा जगन्नाथ माळी मंगळवारी (ता. ५) चोपडा पोलिस ठाण्यात आला. त्याने सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप अराख यांना लासूर गावातील खुनाची माहिती दिली. त्याने सांगितल्यानुसार रतिलाल जगन्नाथ माळी दारूच्या नशेत एका महिलेच्या घरात शिरला होता. रात्री पाऊणच्या सुमारास तो घरात झोपलेला असताना महिलेचा दीर नवल मंगेश महाजन, विकेश नवल महाजन, भूषण कैलास मगरे, दादू राजेंद्र साळुंखे या चौघांनी भाऊ रतिलाल जगन्नाथ माळी याच्यावर लाठ्याकाठ्यांसह बेदम मारहाण केली असून, त्यात रतिलालचा खून झाल्याच्या तक्रारीवरून चौघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप अराक यांनी घटना कळताच घटनास्थळ गाठून चौघा संशयितांना ताब्यात घेतले. फॉरेन्सिक टीमने घटनास्थळी पुरावे संकलनासह पंचनामा केला.
‘सख्खा भाऊ पक्का वैरी’
मृत रतिलाल जगन्नाथ माळी याने दारूच्या नशेत यापूर्वीही गावातील महिलांची छेड काढली होती. बदनामी झाल्याने प्रदीप ऊर्फ आबा जगन्नाथ माळी याचे लग्नच जुळत नव्हते. घटनेच्या रात्री रतिलाल एका महिलेच्या घरात सापडल्यावर अटकेतील चौघा संशयितांसह सख्खा भाऊ असलेला प्रदीप ऊर्फ आबा मारेकऱ्यांमध्ये सामील होऊन त्याने देखील मृताला बेदम मारहाण केल्याचे पुरावे समोर आल्याने संशयिताला शनिवारी अटक करण्यात आली.
‘एसपीं’चे होते तपासावर लक्ष
खुनाची घटना घडल्यानंतर पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी घटनेची माहिती घेत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देत मार्गदर्शन केले. अपर अधीक्षक सचिन गोरे (चाळीसगाव), उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्र रायसिंग यांच्या मागर्दशनात सहाय्यक निरीक्षक संदीप अराक, भरत नाईक, राजू महाजन, सुनील जाधव, संदीप धनगर यांच्या पथकाने गुन्हा उघडकीस आणला. गुन्ह्यात पाचवा संशयित स्वतः फिर्यादी आणि मृताचा सख्खा भाऊ आसल्याने त्याला शनिवारी अटक करण्यात आली आहे.
संपादन ः राजेश सोनवणे