
सकाळी अकराला लसीकरण मोहिमेस सुरवात करण्यात आली. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची उपस्थिती होती.
जळगाव : कोरोना महामारीला हरविण्यासाठी कोविशील्ड लस जळगावात दाखल झाल्यानंतर आजपासून लसीकरणास सुरवात करण्यात आली. जिल्हा रूग्णालयात याचा शुभारंभ झाला असून, पहिली लस वैद्यकिय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी घेतली.
कोरोनाला हरविण्यासाठी राज्यभरात कोरोना लसीकरणास सुरवात करण्यात आली. त्या अनुषंगाने जिल्ह्यात कोविशील्ड लस दाखल झाली. आज (ता. १६) सकाळी अकराला लसीकरण मोहिमेस सुरवात करण्यात आली. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची उपस्थिती होती.
आरोग्य यंत्रणेतील प्रमुखांनी घेतली लस
जिल्हा रुग्णालयाच्या ओपीडी इमारतीत कक्ष क्र. ३०० मध्ये लसीकरणास सुरवात झाली. येथे सुरुवातीला आरोग्य यंत्रणेच्या प्रमुखांनी ‘कोविशील्ड’ लस घेतली. यात अधिपरिचारिका कुमुद जवंजार यांनी अधिष्ठाता डॉ. रामानंद यांना डाव्या हाताच्या दंडावर पहिली लस टोचून लसीकरण प्रक्रियेला प्रारंभ केला. त्यानंतर अनुक्रमे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भीमाशंकर जमादार, अधिसेविका कविता नेतकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. वैभव सोनार, उप अधिष्ठाता डॉ. अरुण कसोटे यांनी लस घेतली.
अर्धा तास निरीक्षण कक्षा
कोरोनाची लस घेतल्यानंतर सर्वांना अर्धा तास निरीक्षण कक्षात ठेवण्यात आले आहे. येथे डॉ. डॅनियल साझी, डॉ. हृषीकेश येऊळ, डॉ. प्रदीपकुमार शेट्टी यांच्या देखरीत आहेत. ‘शावैम’मध्ये एकूण १०० आरोग्य कर्मचाऱ्याच्या लसीकरणाचे नियोजन करण्यात आले होते. याठिकाणी अधिपरिचारिका अर्चना धिमते, जयश्री वानखेडे, कुमुद जवंजार, प्रदीप बावस्कर, इशांत पाटील आदी लसीकरण प्रक्रिया राबवित आहेत.