जळगाव शहरात चिंता वाढली; एकूण बाधितांमधील सर्वाधिक रूग्‍ण शहरात

राजेश सोनवणे
Tuesday, 29 December 2020

कोरोना व्हायरसचे संक्रमण अजून देखील थांबलेले नाही. त्‍यात आता विवाह सोहळे आणि इतर कार्यक्रम होत असल्‍याने त्‍यात होणारी गर्दी अधिक चिंता वाढवत आहे.

जळगाव : जिल्‍ह्‍यातील कोरोनाची स्‍थिती कधी दिलासादायक तर कधी चिंताजनक होत आहे. यातच दोन दिवसांपासून नवीन बाधितांची संख्या अधिक येत असून, कोरोनामुळे मृत देखील होत आहेत. कोरोनामुळे सोमवारी तीघांचा मृत्‍यू झाला असताना आज आणखी दोन जणांचा मृत्‍यू झाला.
कोरोना व्हायरसचे संक्रमण अजून देखील थांबलेले नाही. त्‍यात आता विवाह सोहळे आणि इतर कार्यक्रम होत असल्‍याने त्‍यात होणारी गर्दी अधिक चिंता वाढवत आहे. कोरोनामुळे नवीन बाधित होणाऱ्यांचा आकडा नियंत्रणात असला तरी तो चिंता वाढविणारा आहे. आज आलेल्‍या अहवालानुसार जिल्‍ह्‍यात एकूण ३८ नवीन बाधित आढळले असून, ५० रूग्‍ण बरे होवून घरी परतल्‍याची दिलासादायक बाब आहे.

३९२ रूग्‍ण घेताय उपचार
जिल्हा कोवीड रूग्णालयाने पाठविलेल्या अहवालात जिल्ह्यात ३८ बाधित रूग्ण आढळून आले; तर ५० रूग्ण कोरोनामुक्त झाले आहे. आजच्या अहवालानंतर जिल्ह्यात एकुण ५५ हजार ७१५ बाधित रूग्ण झाले आहे. त्यापैकी ५३ हजार ९९८ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तसेच बाधित रूग्‍णांमधील ३९२ ॲक्‍टीव रूग्‍ण असून ते उपचार घेत आहे.

जळगाव शहरात चिंताजनक
कोरोनाच्या बाबती जळगाव शहराची स्‍थिती पुन्हा एकदा चिंताजनक होत आहे. कारण आजच्या एकूण बाधितांमध्ये सर्वाधिक १५ रूग्‍ण हे केवळ जळगाव शहरातील आहेत. तसेच दिवसभरात जळगाव शहरातील दोन बाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे जळगावकरांसाठी ही चिंताजनक बाब असून, तोंडाला मास्‍क लावणे आणि जास्‍त गर्दीत न फिरणेच फायद्याचे ठरणार आहे.

असे आढळले रूग्‍ण
जळगाव शहर १५, जळगाव ग्रामीण ४, भुसावळ ३, अमळनेर ३, चोपडा २, पाचोरा १, भडगाव २, धरणगाव १, जामनेर १, पारोळा १, चाळीसगाव ३, बोदवड २ असे एकुण ३८ बाधित रूग्ण आढळले आहे. तर यावल, एरंडोल, रावेर आणि मुक्‍ताईनगर तालुक्‍यात एक देखील रूग्‍ण आढळून आला नाही.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi jalgaon news coronavirus two death and new patient