मनपाच्या कोविड सेंटरमध्ये उरले सात रुग्ण 

सचिन जोशी
Tuesday, 29 December 2020

साडेपाच लाख लोकसंख्येच्या शहरात आतापर्यंत सुमारे दोन टक्के लोकसंख्या बाधित होऊन गेली. जवळपास तेवढेच रुग्ण बरे होऊन आता केवळ १९४ ॲक्टिव्ह रुग्ण शहरात आहेत.

जळगाव : जून ते सप्टेंबरदरम्यान मनपातील कोविड सेंटरमध्ये कोरोनाबाधितांना बेडही मिळणे कठीण झालेले असताना त्यानंतरच्या तीन महिन्यांत स्थिती बदलून आता पालिकेच्या एकमेव सेंटरमध्ये केवळ सात रुग्ण आहेत. 
साडेपाच लाख लोकसंख्येच्या शहरात आतापर्यंत सुमारे दोन टक्के लोकसंख्या बाधित होऊन गेली. जवळपास तेवढेच रुग्ण बरे होऊन आता केवळ १९४ ॲक्टिव्ह रुग्ण शहरात आहेत. हे यंत्रणेचे यश असले तरी जिल्ह्यात सर्वाधिक रुग्णांसह मृत्यू झालेल्या एक हजार ३२० पैकी सर्वाधिक २८४ बळी जळगाव शहरातील आहेत, हीदेखील चिंतेची बाब म्हणावी लागेल. 

कोरोनाचा वाढता संसर्ग 
जिल्ह्याचे ठिकाण व महापालिका क्षेत्र म्हणून जळगाव शहरात कोरोनाचा संसर्ग अधिक तीव्रतेने वाढेल, अशी शक्यता होतीच. जून ते सप्टेंबरदरम्यान ती खरीही ठरली. या काळात जिल्ह्यासह जळगाव शहरातही मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढले. जिल्ह्याचा आकडा ५० हजारांच्या पार जात असताना जळगाव शहरातील रुग्णसंख्येने दहा हजारांचा टप्पा ओलांडला होता. 

तेरा हजार रुग्ण 
सद्य:स्थितीतही जळगाव शहरात जिल्ह्यातील अन्य तालुके व शहरांपेक्षा दररोज आढळणाऱ्या रुग्णांची संख्या जास्तच आहे. सप्टेंबरपासून जिल्ह्यातील रुग्णसंख्या घटत आहे. शहरातही ती घटत असली तरी इतर तालुक्यांच्या तुलनेत घट कमीच आहे. त्यामुळे शहराचा एकूण रुग्णांचा आकडा आता १३ हजारांच्या टप्प्यात आहे, तर १२ हजार ४६४ रुग्ण बरेही झाले आहेत. 

कोविड सेंटर रिकामे 
जळगाव शहरात झपाट्याने वाढलेल्या रुग्णांसाठी पालिकेने शासकीय तंत्रनिकेत, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील सुमारे सात इमारती अधिग्रहित करून त्याठिकाणी रुग्णांसाठी बेडची व्यवस्था केली होती. ऑगस्ट- सप्टेंबरमध्ये या कोविड सेंटरमध्ये तब्बल तीन हजारांवर रुग्ण होते. १७ सप्टेंबरनंतर दररोजच्या रुग्णांची संख्या घटत गेल्यानंतर टप्प्याटप्प्याने दाखल रुग्णही कमी होत गेले. तीनच महिन्यांत पालिकेने अधिग्रहित केलेल्या सातपैकी सहा इमारती रिक्त झाल्या. आता तर अभियांत्रिकीच्या सेंटरला केवळ सात रुग्ण उरलेत. तर तंत्रनिकेतनमधील एका इमारतीत चाचण्या सुरू आहेत. 
 
शहरात तिसरे सिरो सर्वेक्षण 
केंद्र सरकारच्या आरोग्य खात्याकडून प्रातिनिधिक स्वरूपात कोरोनाचा आढावा घेण्यासाठी टप्प्याटप्प्याने विविध भागात सिरो सर्वेक्षण केले जात आहे. गेल्या आठवड्यात केंद्र सरकारचे पथक या सर्वेक्षणासाठी शहरात येऊन गेले. तांबापुरा, मेहरुण भागात त्यांनी हे सर्वेक्षण केले. केंद्राच्या पथकाने शहरात केलेले हे तिसरे सिरो सर्वेक्षण आहे. 
 
गेल्या काही दिवसांपासून नव्याने आढळून येणाऱ्या रुग्णांत बऱ्यापैकी घट आली असून, ही समाधानाची बाब आहे. संसर्ग नियंत्रणात असल्याची स्थिती असली तरी महापालिकेकडून चाचण्या, बाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचे टेस्टिंग, व्यापारी व त्यांच्या संपर्कातील व्यक्तींची तपासणी मोहीम आदी उपाययोजना सुरूच आहेत. 
-डॉ. राम रावलानी (प्रमुख वैद्यकीय अधिकारी, मनपा) 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi jalgaon news corporation covid center only sevan patient