मुलाला रेल्‍वेत नोकरी लागेल म्‍हणून ठेवले घर गहाण पण..

रईस शेख
Sunday, 17 January 2021

आत्या सरस्वती पिंगळे मध्यप्रदेशातील अलीराज पूर येथे वास्तव्यास असून तेथे त्याचे येणे जाणे होते. परिणामी जितेंद्र वाणी यांच्या वडिलांशी मैत्री करून जितेंद्र उच्चशिक्षित असून त्याला रेल्वेत नोकरी लावून देण्याचा प्रस्ताव ठेवला.

जळगाव : शहरातील देवरामनगरातील संशयिताने मध्यप्रदेशातील जोडप्याला रेल्वेत नोकरी लावून देण्याचे आमिष देत २० लाख ९६ हजारांत फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मध्यपद्रेशातील अलिराजपुर पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात मध्यप्रदेश पोलिस पथक जळगाव येथे आले. गुन्हेशाखेच्या पथकाने संशयिताला ताब्यात घेत संबंधितांच्या स्वाधीन केले. 

संशयित हरिष चिंतामण आटोळे (वय ४०; रा. देवरामनगर, गुजराल पेट्रेपंपाच्या मागे ) याची आत्या सरस्वती पिंगळे मध्यप्रदेशातील अलीराज पूर येथे वास्तव्यास असून तेथे त्याचे येणे जाणे होते. परिणामी जितेंद्र वाणी यांच्या वडिलांशी मैत्री करून जितेंद्र उच्चशिक्षित असून त्याला रेल्वेत नोकरी लावून देण्याचा प्रस्ताव ठेवला. माझी रेल्वेच्या मोठ्या अधिकाऱ्यांसोबत उठबस असून थोडा पैसा खर्च केला की, आयुष्यभर ऐश अशा बाता मारून त्याने जितेंद्र व त्याच्या वडिलांना बोलण्यात मोहीत करून टाकले. थोड्याच वेळात जितेंद्रची पत्नी अंकिता वाणी हिला देखील नोकरी लागू शकते, पती- पत्नी दोघेही नोकरीवर लावण्यासाठी त्याने २० लाख ९६ हजार ५०० रुपयात गंडवले 

हॉटेलिंगसह महागड्या कार्स 
हरिष आटोळे मध्यप्रदेशात जात असताना पांढऱ्या रंगाच्या चारचाकी वाहनांचा वापर करत असे. त्याच्याकडे (एमएच.१८सी.व्ही.१९८९) आणि (एमएच.१९.सीयु.१९९०) अशा देान गाड्या वापरात होत्या. अलीराजपुर येथे गेल्यावर तो थ्रीस्टॉर हॉटेल साई पॅलेस मध्येच थांबायचा. नेहमी त्याला नोकरी लावून देण्याचे फोन येत असल्याने तक्रारींचा विश्वास बसला होता. 

घर गहाण ठेवून दिला पैसा 
वाणी दाम्पत्याकडे गावातील वडिलोपार्जित राहते घर असून ते गहाण ठेवून काही रक्कम व्याजाने आणून हरिष आटोळे याला दिली. वर्ष उलटले तरी नोकरीचा कॉल येत नाही म्हणून संपर्क केल्यावर त्याने उडवा- उडवीची उत्तरे दिली. वाणी कुटुंबीय एकेदिवशी जळगावी धडकले. त्यांनी घर शोधून काढल्यावर त्याला गाठले असता, त्याच्या पत्नी व मुलाने त्यांना पिटाळून लावले. 

संघटित गुन्हेगारी 
माहिती काढल्यावर हरिष आटोळे याने मुलगा निरज, सुनील चंद्रकांत खोमने, सुखलाल भिला, तुषार गजानन पाटील यांच्या खात्यावर पैसे वळते केल्याचे दिसून आले. मध्यप्रदेश पोलिसांनी संपर्क केल्यावर पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांच्या मार्गदर्शनात गुन्हेशाखेचे निरीक्षक किरणकुमार बकाले, उपनिरीक्षक धीरेश धारवाल, मनिष कुमार (मध्यप्रदेश), गुन्हे शाखेचे विजयसिंग पाटील, विजय पाटील, अश्रफ शेख, नरेंद्र वारुळे यांच्या पथकाने हरिष याला ताब्यात घेत मध्यप्रदेश पोलिसांच्या स्वाधीन केले. 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi jalgaon news crime news fraud showing job lure