तरूणाचा खून करून टाकले जळकी मिलमध्ये; संशयीतास मध्यरात्री घेतले ताब्‍यात

रईस शेख
Monday, 25 January 2021

शहरातील शाहूनगर परिसरात असणाऱ्या जळकी मिलजवळ एका तरूणाचा मृतदेह आढळून आला. त्याच्या अंगावर जखमा असल्याने त्याचा घातपाताने मृत्यू झाल्याचा प्राथमिक संशय व्यक्त करण्यात आला होता.

जळगाव : शहरातील शाहूनगरातील जळकी मिल परिसरात २० वर्षीय तरुणाला मारून मृतदेह फेकल्याचे आढळून आले. मिलमध्ये मृतदेह आढळल्यानंतर या प्रकरणाचा उलगडा झाला असून अल्तमश शेख शकिल (वय २०) असे मृत तरुणाचे नाव आहे. 

शहरातील शाहूनगर परिसरात असणाऱ्या जळकी मिलजवळ एका तरूणाचा मृतदेह आढळून आला. त्याच्या अंगावर जखमा असल्याने त्याचा घातपाताने मृत्यू झाल्याचा प्राथमिक संशय व्यक्त करण्यात आला होता. त्‍यानुसार पोलिसांनी तपास केला असताना सदर तरूणाचा खून केल्‍याचे स्‍पष्‍ट झाले. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत संशयीतास मध्यरात्री दीडच्या सुमारास ताब्‍यात घेतले.

अंडापाव गाडीवर झाला होता वाद
महिनाभरापूर्वी अंडापाव गाडीचालकाशी त्याचा किरकोळ वाद होऊन हाणामारी झाली होती. त्या वेळेस तो पोलिस कोठडीतही जाऊन आला होता, अशी माहिती त्याच्या कुटुंबीयांनी दिली. त्यातूनच आमच्या मुलाची हत्या झाल्याचा संशय त्याच्या कुटुंबीयांनी वर्तविला. 

वडीलांचे गॅरेजचे काम
मृत तरुणाचे वडील गोलाणी मार्केटमधील अग्निशमन दलाच्या कार्यालयाशेजारी गॅरेजचे काम करून उदनिर्वाह चालवतात. घटनेचे वृत्त कळताच शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक धनंजय येरूळे, गुन्हे शोध पथकाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. रात्री उशिरा सहाय्यक पोलिस अधीक्षक कुमार चिंथा यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi jalgaon news crime news young boy murder case