दहा महिन्यात बारा सुवर्णपदक; आंतरराष्ट्रीय स्तरावर जळगावच्या देवेशचा विक्रम 

राजेश सोनवणे
Wednesday, 3 February 2021

अमेरिकेतील जॉन हॉपकीन विद्यापीठाच्या सॅट जनरल मॅथ परिक्षेत देवेश भय्याने ८०० पैकी ८०० गुण मिळवित ‘ग्रँड ऑनर अ‍ॅवार्ड मेडल’ प्राप्त करीत या विद्यापीठाच्या सेंटर फॉर टॅलेंट युथ मध्ये स्थान मिळविले आहे.

जळगाव : शहरातील देवेश भय्या या अवघ्या १२ वर्षीय मुलाने पालकांच्या मार्गदर्शनाने ऑनलाईन परिक्षांची संधी हेरली आणि अवघ्या १० महिन्यांत भारताचे प्रतिनिधीत्व करीत आतंरराष्ट्रीय पातळीवरील विविध देशांमधील गणिताच्या परिक्षांमध्ये यशस्वी होत १२ सुवर्णपदके प्राप्त करीत विक्रमच केला आहे. 
अमेरिकेतील जॉन हॉपकीन विद्यापीठाच्या सॅट जनरल मॅथ परिक्षेत देवेश भय्याने ८०० पैकी ८०० गुण मिळवित ‘ग्रँड ऑनर अ‍ॅवार्ड मेडल’ प्राप्त करीत या विद्यापीठाच्या सेंटर फॉर टॅलेंट युथ मध्ये स्थान मिळविले आहे. थायलंड इंटर नॅशनल मॅथेमॅटिक्सऑलींपियाड, साऊथईस्ट एशियन मॅथेमॅटिक्स ऑलींपियाड, इंटरनॅशनल मॅथेमॅटिक्स ऑलींपियाड या तीनही परिक्षेत त्याने प्रथम वर्ल्ड रँक मिळवित सुवर्णपदके मिळविली. सिंगापूर अ‍ॅन्ड एशियन स्कूलमध्ये मॅथ्स ऑलींपियाड, इंटरनॅशनल ज्युनियर मॅथ ऑलींपियाड, हाँग काँग इंटरनॅशनल मॅथेमॅटिकल ऑलींपियाड, इंटरनॅशनल मॅथ कांगारु कॉम्पीटिशन, सिंगापूर इंटरनॅशनल मॅथ्स ऑलींपियाड चॅलेंज, साऊथ ईस्ट एशियन मॅथेमॅटिक्स ऑलींपियाड एक्स नेक्स्ट लेव्हल या सहा परीक्षांत देवेशला इंटरनॅशनल गोल्ड मेडल प्राप्त झाली आहेत. पैकी तीन परीक्षांत देवेशला ‘वर्ल्ड चॅम्पियन’ होण्याचा सन्मान लाभला. 

बेस्ट ब्रेन ऑफ इंडिया म्‍हणूनही निवड
वर्ल्ड इंटरनॅशनल मॅथेमॅटिकल ऑलींपियाडमध्ये द्वितीय रँक तर आशिया इंटरनॅशनल मॅथेमॅटिक्स ऑलींपियाडमध्ये तृतीय रँक (वर्ल्ड सेकंड रनर अप) हे स्थान प्राप्त करीत त्याने आणखी दोन सुवर्ण पदके पटकावली. या बारा सुवर्ण पदकाशिवाय याच कालावधीत देवेशला अमेरिकन मॅथ कॉन्टेस्ट (इ.8 वी) मध्ये प्रथम रँक तर अमेरिकन मॅथ कॉन्टेस्ट (इ.10 वी) मध्ये ‘ऑनर’चा बहूमान मिळाला आहे. ऑस्ट्रेलियन मॅथ कॉन्टेस्टमध्ये त्याने ‘हायर डिस्टींग्शन’ तर पर्पल कामेंट मॅथ मीट 2020 चा तो ‘विजेता’ ठरला आहे. ‘अ‍ॅलन चॅम्प 2020 बेस्ट ब्रेन ऑफ इंडिया’ म्हणून देखील देवेशची निवड झाली आहे. अमेरिकेतील जॉन हॉपकीन विद्यापीठाच्या सेट प्रीकॉलेज न्यूज लेटरमध्ये त्याचा छायाचित्रासह परिचय प्रकाशित करण्यात आला आहे. 

‘बालशक्ती’ने सन्मानित 
देवेश हा एल.एच.पाटील इंग्लिश मीडियम स्कूलमधील सातवीचा विद्यार्थी असून आर्किटेक्ट पंकज व इंटेरियर डिझाईनर पल्लवी भय्या यांचा तो पुत्र आहे. गेल्या वर्षी देवेशला प्रधानमंत्री बालशक्ती पुरस्काराने राष्ट्रपती व पंतप्रधानाच्या उपस्थितीत दिल्लीत गौरविण्यात आले होते. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi jalgaon news devesh bhaiya last ten month twenty gold medal