esakal | success story : शेतकरीपुत्र झाला इंजिनिअर पण धडपड बळीराजासाठीच; ‘हवामान’ ॲप ठरणार वरदान
sakal

बोलून बातमी शोधा

Farmer hawaman app

success story : शेतकरीपुत्र झाला इंजिनिअर पण धडपड बळीराजासाठीच; ‘हवामान’ ॲप ठरणार वरदान

sakal_logo
By
विलास जोशी

वाकोद (जळगाव) : तोंडापूर (ता. जामनेर) येथील शेतकरी कुटुंबातील पंकज दिगंबर पाटील यांनी सातासमुद्रापार राहून शेतकऱ्यांसाठी (farmer) उपयुक्त असे हवामान ॲप (Hawaman app) तयार केले असून, हे ॲप शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार आहे. (farmer son engineer in america and develop hawaman app.)

पंकज पाटील यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण गावातीलच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा श्रीमती रत्‍नाबाई सुरेश जैन माध्यमिक विद्यालयात झाले व महाविद्यालयीन शिक्षण तालुक्याच्या ठिकाणी, तर संगणक अभियंता ही पदवी प्रवरानगर येथे घेऊन उच्च शिक्षणासाठी अमेरिका गाठली. वडील दिगंबर केशव पाटील हे जिल्ह्याच्या राजकारणातील एक बडे प्रस्त असूनही राजकारणाची हवा डोक्यात न शिरू देतात त्यांनी जिद्द व चिकाटीने शिक्षण पूर्ण केले.

हेही वाचा: हावडा एक्स्प्रेसमध्ये पुन्हा प्रवाशाचा मृत्यू; अमळनेर स्थानकावर मृतदेह उतरवत कोच सॅनिटायझेशन

शेतीशी नाळ जुळलेलीच

शेतकरी कुटुंबात जन्माला आल्यामुळे बालपणापासूनच शेतीशी नाळ जुळलेली. भारतीय शेतकऱ्यांच्या जीवनातील चढ-उतार अगदी जवळून पाहिल्यामुळे व निसर्गाच्या लहरीपणाचा भारतीय शेतकऱ्यांच्या जीवनावर होणारा परिणाम वैफल्यग्रस्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या यासारख्या समस्यांची जाणीव पंकज पाटील यांच्या संवेदनशील मनाला अस्वस्थ करणारी होती. विदेशात राहूनही मातृभूमीत बळीराजाने निसर्गाच्या लहरीपणामुळे होणारे हाल, यातून निर्माण होणारे नैराश्‍य व त्याची परिणिती आत्महत्येत होताना पाहून यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न त्यांनी करायला सुरवात केली. पंकज पाटील हे नासा या आंतरराष्ट्रीय संशोधन संस्थेच्या एका पेटंटवर काम करीत होते, जे त्यांनी यशस्वीरित्या पूर्ण केले. त्यांच्या या कामाची दखल नासाने यापूर्वीच घेतलेली आहे. त्याबद्दल त्यांनी त्यांच्या वेबसाइटवर लेखदेखील प्रसिद्ध केला आहे.

‘हवामान’ ॲपद्वारे अचूक माहिती

भारतीय हवामानाची अनिश्चित स्थिती व त्याविषयीचा अचूक अंदाज वर्तविणारे या यंत्रणेचा अभाव हीच खरी शेतकऱ्यांच्या दैन्यावस्थेची कारणे आहेत. यामुळेच शेतकऱ्यांना शेतीचे अचूक नियोजन करता येत नाही. परिणामी, त्याला यातून सावरण्यासाठी पंकज पाटील यांनी नासात कार्यरत असताना पृथ्वीभोवती फिरणारे कृत्रिम ग्रह, उपग्रह व त्याद्वारे मिळणाऱ्या वातावरणातील विविध घटकांची माहिती जसे उपग्रहाद्वारे मिळणाऱ्या छायाचित्रांवरून एखाद्या प्रदेशातील ढगांची स्थिती, पृथ्वीची पृष्ठभागापासूनची उंची, ढगांची जाडी, त्यांची बाष्पधारण क्षमता, हवेचा वेग, हवेची दिशा, हवेतील आर्द्रतेचे प्रमाण, तापमानातील दर तासातील बदल, देशातील प्रत्येक ठिकाणचा सूर्योदय व सूर्यास्ताची अचूक वेळ, आठवड्यातील हवामानाची स्थिती इत्यादी सर्व घटकांचा सखोल अभ्यास करून उपग्रहाद्वारे मिळणाऱ्या माहितीचा वापर करून शेतकऱ्यांसाठी ‘हवामान’ या नावाचे ॲप तयार केले आहे. तसेच त्यांनी एलिका जीओ स्पेशल ही कंपनीसुद्धा स्थापित केली आहे. ही कंपनी उपग्रहावरून मिळणाऱ्या माहितीवर कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून महत्त्वाचा आणि उपयुक्त डाटा बनवण्याचे काम करते.

हेही वाचा: बळीराजाला दिलासा! बाजारात कांदा, लसणाचे भाव वधारले

..असे आहे ॲप

पंकज पाटील यांनी बनवलेले ॲप खाली दिलेल्या लिंक्स https://play.google.com/store/apps/details?id=com.ilikallc.hawamaan वर मोफत उपलब्ध असून, हे ॲप शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार असून, विदेशात राहूनही स्वदेशाबद्दल असलेली तळमळ आस्था व बांधिलकी निश्चितच वाखाणण्याजोगी आहे.

loading image
go to top