पांढऱ्या सोन्याला मिळतोय क्विंटलला ६ हजारांवर भाव 

cotton
cotton

जामनेर (जळगाव) : तालुक्यात एप्रिलच्या उंबरठ्यावर शेतकऱ्यांच्या चांगल्या प्रतिच्या पांढऱ्या सोन्याला (कापूस) क्विंटलला सहा हजारावर भाव मिळत आहे. खासगी व्यापारी- जिनिंग प्रेसिंगमधील प्रतिक्विंटल ६ हजार २०० तर काही ठिकाणी ६ हजार ४०० रुपयांचा भावही शेवटच्या टप्प्यात मिळू लागला आहे.
घरात सुरक्षित कापूस ठेऊन घेणाऱ्या शेतकऱ्यांना अखेरीस का होईना प्रतिक्विंटलमागे वाढलेल्या आठशे ते हजार रूपये फरकाचा चांगलाच आर्थिक लाभ होऊन शेतकऱ्यांसाठी दिलासादायक स्थिती निर्माण झाली आहे. सोबतच शेवटची वेचणी करून आगामी हंगामासाठीही शेतकऱ्यांची लगबग सुरू झाल्याचे दिसते. शेवटची कापूस वेचणीतील फर्दड स्वरूपाच्या मालालाही ४४०० ते ४५०० प्रतिक्विंटलचा दर मिळत आहे. 

अवकाळीने पिकांचे नुकसान
दोन- तीनदा तालुकाभरात झालेल्या गारपिटीसह वादळी वाऱ्याच्या अवकाळी पावसाने मका, गहू, हरबरा, ज्वारी केळी पिकांसह कापसाचेही बऱ्याच ठिकाणी नुकसान होऊन शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यांना नुकसान भरपाई दिली जावी, अशी मागणीही शासनस्तरावर लेखी स्वरूपात करण्यात आली. तत्पूर्वी झालेल्या नुकसानीचे पंचनामे होणे गरजेचे आहे, तसे मात्र होताना तालुकाभरात कोठेही दिसत नाही. असे असले तरी शेवटच्या टप्प्यात का होईना, कापसाचा भाव मध्यप्रदेश आणि गुजरातच्या मार्केटमध्ये चांगलाच वधारल्याचे सांगण्यात येते आणि खासगी व्यापाऱ्यांकडून शेतकरी बांधवांकडून खरेदी केलेल्या कापसाच्या ट्रकच्या ट्रक भरून दररोज रवाना होत आहेत, हे येथे उल्लेखनीय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com