खोटा गुन्हा पण पडद्यामागचे सुत्रधार वेगळेच : गिरीश महाजन

कैलास शिंदे
Saturday, 19 December 2020

मविप्र संस्थेशी आपला कोणताही संबध नाही. आपण या संस्थेचे सभासदही नाही. मात्र आपल्याविरूद्ध हे राजकीय षडयंत्र रचण्यात आले आहे.

जळगाव : आपल्याविरूद्ध माराहाण व चाकूचा धाक दाखविल्याबाबत दाखल करण्यात आलेला गुन्हा हे सुडाचे राजकारण आहे. तक्रारदार ॲड. विजय पाटील दिसत असले तरी, पडद्यामागचे सुत्रधार वेगळे असून, ते समोर येतील. मात्र अशा प्रकारे खोटे गुन्हे दाखल करून आपण मोठे होवू असे कोणाला वाटत असेल तर ते चुकीचे आहे. मग आम्हीही गप्प बसणार नाही. ते खोटे करतात, आम्ही पुराव्यासह खरी माहिती समोर आणू असा टोला माजी मंत्री व भाजप नेते गिरीश महाजन यांनी लगावला आहे. 
जळगाव येथील मविप्र समाज संस्थेवर ताबा मिळविण्यासाठी २०१८ मध्ये पुणे येथे बोलावून चाकूचा धाक दाखवून आपल्याला मारहाण करण्यात आली अशी तक्रार ॲड. पाटील यांनी निंभोरा येथे दाखल केली आहे. त्यानुसार माजी मंत्री श्री. महाजन व त्यांचे सहकारी रामेश्‍वर नाईक यांच्यासह २९ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. या संदर्भात महाजन यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेतली. त्या वेळी ते बोलत होते. ते म्हणाले, कि मविप्र संस्थेशी आपला कोणताही संबध नाही. आपण या संस्थेचे सभासदही नाही. मात्र आपल्याविरूद्ध हे राजकीय षडयंत्र रचण्यात आले आहे. मुळात, २०१८ मधील घटनेबाबत तब्बल तीन वर्षांनी फिर्याद दाखल करण्याचे कारण काय, हेच समजत नाही. विशेष म्हणजे तक्रारदार पाटील हे दोन ते तीन वेळा भेटले आहेत. त्यावेळी त्यांनी याबाबत कोणताही उल्लेख केला नाही. आता थेट गुन्हा दाखल केला आहे. 

निव्वड त्रास देण्याचे राजकारण
ही घटना पुणे येथे घडल्याचे ते म्हणतात, ते राहतात जळगावला मग या दोन्ही ठिकाणी गुन्हा दाखल न करता निंभोरा येथे गुन्हा कसा दाखल करण्यात आला हा प्रश्‍नच आहे. या प्रकरणात पडद्यामागचे सुत्रधार वेगळेच आहेत. ते समोर येईलच मात्र हा अत्यंत किळसवाणा प्रकार आहे. केवळ त्रास देण्याच्या हेतूने हे सुडाचे राजकारण केले जात आहे. असे होत असेल तर ते योग्य नाही. सरकारकडून यावर दबाव आणला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. कोणाचेही नाव घेता ते म्हणाले, या मागे कोण आहे हे सर्वानाच माहिती आहे. मात्र, ते जरी खोटे गुन्हे दाखल करीत असले तरी, आमच्याकडे त्यांच्याविरूद्ध पुराव्यासह माहिती आहे. आम्हीही गप्प बसणार नाही. 

मुंबंई उच्च न्यायालयात याचिका 
श्री. महाजन म्हणाले की, या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून, ७ जानेवारीपर्यंत आपल्यावर कोणतीही कारवाई करू नये असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. या प्रकरणी आपल्याला अटकपूर्व जामीन नको. संपूर्ण गुन्ह्याच्या चौकशी करावी, तक्रारदार व आपण त्यावेळी कोठे होतो याची माहिती घ्यावी, संपूर्ण सत्य माहिती घेवून या खोट्या तक्रारीबाबत कारवाई करावी अशी मागणीही आपण केली आहे. न्या. एस. एस. शिंदे व न्या. एस. एस. कर्णिक यांच्या खंडपीठाने मागणी मान्य केली असून, या प्रकरणी ८ जानेवारीला सुनावणी होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. महापौर भारती सोनवणे, जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश भोळे, उपमहापौर सुनील खडके, स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे, भाजप जिल्हा महानगराध्यक्ष दीपक सूर्यंवंशी, नगरसेवक कैलास सोनवणे, विशाल त्रिपाठी आदी उपस्थित होते. 

सुनील झवर सर्व पक्षाचे मित्र 
दरम्यान, बीएचआर प्रकरणी महाजन म्हणाले, या प्रकरणातही आपल्यावर आरोप करण्यात येत आहेत. सुनील झवर हे महाजन यांचे मित्र आहेत, त्यामुळे त्यांचाही सहभाग असल्याचे बोलले जात आहे. परंतु, हे सर्व चुकीचे आहे. झवर हे माझेच मित्र आहेत असे नाही तर, ते सर्वांचेच मित्र आहेत. सर्वच पक्षांशी त्यांचे मित्रत्वाचे संबध आहेत. केवळ मित्र आहेत म्हणून नाव जोडणे चुकीचे आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

संपादन ः राजेश सोनवणे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi jalgaon news girish mahajan reaction in fir case