ग्रामपंचायत निवडणूक..जिल्ह्यात १९ हजार ९८३ अर्ज वैध 

देवीदास वाणी
Saturday, 2 January 2021

ग्रामीण भागात ग्रामपंचायती निवडणुकीचा रंग आता चांगलाच चढला आहे. अनेक गावांमध्ये दुरंगी, तिरंगी लढतीची चिन्हे, तर काही ठिकाणी उमेदवारांनी पॅनलच्या माध्यमातून न लढता स्वतंत्रपणे लढविण्यावर भर दिला आहे. 

जळगाव : जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रियेत गुरुवारी (ता.३१) रात्री उशिरापर्यंत अर्जांची छाननी सुरू होती. त्यात १९ हजार ९८३ अर्ज वैध, तर २८८ अर्ज अवैध ठरले. आता लक्ष उमेदवारी माघारीकडे लागले आहे. येत्या सोमवारी (ता. ४) अर्ज माघारीची शेवटची तारीख आहे. त्या वेळी किती उमेदवार माघारी घेतात, किती बिनविरोध होतात, याकडे उमेदवारांसह नागरिकांचे लक्ष लागले आहे. 
जिल्ह्यात ७८३ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. ३० डिसेंबरपर्यंत सात हजार २१३ जागांसाठी एकूण २० हजार २७१ अर्ज दाखल झाले होते. त्यांची छाननीची प्रक्रिया गुरुवारी झाली. त्यात काही उमेदवारांच्या अर्जावर अनेकांनी हरकती घेतल्याने छाननीदरम्यान वैध, अवैध अर्जांची संख्या सर्वच तहसील कार्यालयातून जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाली नव्हती. ती शुक्रवारी प्राप्त झाली. त्यात २० हजार २७१ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यातील १९ हजार ९८३ अर्ज वैध, तर २८८ उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले आहेत. 

 

डावपेच आखण्याचे नियोजन
ग्रामपंचायत निवडणूक म्हटली, की गावातील भाऊबंदकी कामा येते. कोणत्या पक्षाकडे कोणाचा कोण गेला, कोण तिकडे गेला, कोणाचे मुंबईत वजन आहे, कोण खासदाराचा, आमदाराच्या, नेत्यांच्या जवळ आहे. याच्या चर्चा घडू लागल्या आहेत. निवडणुकीत कोणत्या नेत्याला बोलावयाचे, अधिकाधिक मते आपल्याच पॅनलला मिळण्यासाठी डावपेच कसे आखायचे, याचे नियोजन आता सुरू झाले आहे. आपल्या विजयासाठी कोणाला माघारी घ्यावयास लावायची, त्याने माघार घेतली नाही तर इतर काय पर्याय आहेत, याचाही शोध सुरू झाला आहे. 

तालुकानिहाय वैध - अवैध अर्ज 

तालुका--वैध--अवैध 
जळगाव--१५३०--१५ 
जामनेर- २०२४--३० 
धरणगाव- ११२१--२९ 
एरंडोल- ८३९--२४ 
पारोळा-१४५८--२० 
भुसावळ-८४४--८ 
मुक्ताईनगर-११४५--१० 
बोदवड-६१०--९ 
यावल-१२१९--६ 
रावेर-११५३--३१ 
अमळनेर-१३४८--२९ 
चोपडा-१३२१--८ 
पाचोरा- २३२२--३० 
भडगाव-९४३-७ 
चाळीसगाव-२१०६--३२ 
एकूण--१९९८३--२८८ 
 
निवडणूक कार्यक्रम 
अर्ज माघारी, चिन्हवाटप ः ४ जानेवारी २०२१ 
मतदान ः १५ जानेवारी 
मतमोजणी-१८ जानेवारी 

संपादन ः राजेश सोनवणे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi jalgaon news gram panchayat election 19 thousand form selected