Gram panchayat election मतदान केंद्रात उमेदवारांच्या एंट्रीवरून असोद्यात सौम्य लाठीमार 

देवीदास वाणी
Friday, 15 January 2021

पोलिसांनी आवाहन करूनही उमेदवारी मतदान केंद्राच्या बाहेर जात नसल्याने पोलिसांना सौम्य लाठीमार करीत उमेदवारांसह गर्दी करणाऱ्यांना मतदान केंद्राच्या शंभर मिटर परिसराबाहेर घालविण्यात आले. 

जळगाव : जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आज सकाळी साडेसातपासून मतदान सुरू झाले. सर्वच केंद्रावर मतदारांचा चांगला उत्साह दिसून आला. मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगाच रांगा लागल्याचे चित्र दिसून आले. ६८७ ग्रामपंचायतीसाठी आज मतदान प्रक्रिया सुरू झाली आहे. असोदा (ता.जळगाव) येथील मतदान केंद्रावर काही पॅनलचे उमेदवार जावून मतदारांशी संपर्क साधत असताना दुसऱ्या पॅनलच्या उमेदवारांनी त्यावर जोरदार हरकत घेतली. पोलिसांनी आवाहन करूनही उमेदवारी मतदान केंद्राच्या बाहेर जात नसल्याने पोलिसांना सौम्य लाठीमार करीत उमेदवारांसह गर्दी करणाऱ्यांना मतदान केंद्राच्या शंभर मिटर परिसराबाहेर घालविण्यात आले. 

सकाळी साडेसातला मतदान केंद्रावर मतदान सुरू झाले. साडेआठच्या सुमारास असोदा येथील मतदान केंद्रावर मतदानासाठी मतदार आले होते. यामुळे एका पॅनलचे उमेदवारांनी थेट मतदान केंद्राच्या परिसरात जावून मतदारांना नमस्कार, चमत्कार करू लागले. त्यावर दुसऱ्या पॅनलच्या उमेदवारांना पोलिसांकडे यावर हरकत घेत दाद मागीतली. मतदान केंद्राच्या परिसरात उमेदवारांना फिरता येत नाही, मग उमेदवार कसे फिरताहेत असे सांगत गोंधळ घालण्यास सुरूवात केली. पोलिसांनी ध्वनीक्षेपकावरून आवाहन करूनही एका उमेदवार मतदान केंद्राच्या बाहेर जाण्यास तयार नव्हते. यामुळे पोलिसांनी गर्दी पांगविण्यासाठी सौम्य लाठीमार करावा लागला. नंतर उमेदवारही बाहेर आले. त्यांना मतदान केंद्राच्या शंभर मीटरच्या लांब अंतरावर उभे राहण्यास सांगण्यात आले. मतदान केंद्रात मतदानाच्या कामाशिवाय बंदी घालण्यात आली. घटनास्थळी पोलिस अधिक्षक डॉ.प्रविण मुंडे यांनी भेट देवून परिस्थतीचा आढावा घेतला. 

पाच हजार पोलिसांचा बंदोबस्‍त
आजच्या मतदानासाठी दोन हजारांहून अधिक केंद्रे आहे. १३ लाखांवर मतदार आहेत. पाच हजारांवर पोलिसांचा बंदोबस्त तैनात आहे. जिल्ह्यात ९२ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या असून, ६८७ ग्रामपंचायतींसाठी मतदान प्रक्रिया सुरू आहे. सहा लाख २६ हजार सात महिला, तर सहा लाख ७८ हजार ९०६ पुरुष मतदार मतदान करतील. ६९७ ग्रामपंचायतींतील पाच हजार १४५ जागांसाठी एक हजार ३३३ इमारतींमध्ये दोन हजार ४१५ केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया सुरू आहे. 

अकरापर्यंत २२ टक्‍के मतदान
सकाळी दोन तासात १ लाख ५० हजार ८२७ उमेदवारांनी (११.५६ टक्के), तर साडेअकरापर्यंत २ लाख ९० हजार २६६ (२२.२५) मतदारांनी मतदान केले होते. 

असे झाले मतदान 
७.३० ते ९.३०--११.५६ टक्के 
९.३० ते ११.३०--२२.२५ 

संपादन ः राजेश सोनवणे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi jalgaon news gram panchayat election voting center candidate entry