ओव्हरटेक पडला महागात..ताबा सुटला अन्‌ आयशर ८० फुट खाली; प्रत्‍यक्षदर्शींना धडकीच भरली

रईस शेख
Sunday, 10 January 2021

उतार ऐकेरी महामार्गावर समोर चालणाऱ्या वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात समोरुन दुसरे वाहन आले, परिणामी वाहनावरील नियंत्रण सुटले. चालकाचे नियंत्रण सुटून सुसाट आयशर महामार्गावरुन खाली खेालदरीत घरंगळत गेला.

जळगाव : राष्ट्रीय महामार्गावर बांभोरी पुल लागण्याअगोदरच सुसाट आयशर महामार्गाच्या खाली उतरत घरंगळत जावून उलटला. ओव्हरटेक करण्याच्या नादात चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. मृत्यू समोर दिसत असताना चालक राजू माळीने प्रसंगावधान राखत उडी घेतल्याने त्याचा जीव वाचला मात्र, ऐंशी फुट खोलवर घरंगळत गेलेल्या आयशरमुळे मोठ्या झांडाचे व ट्रकचे मोठे नुसान झाले. 
बांभोरी (ता.जळगाव) येथील गोपाळ कोळी यांच्या मालकीचा आयशर आयशर (एम.एच. ०४ सीयू २२८८) रविवार (ता. १०) सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास राष्ट्रीय महामागाने जळगावहून पाळधीकडे जात होता. खेाटेनगरचा उतार ऐकेरी महामार्गावर समोर चालणाऱ्या वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात समोरुन दुसरे वाहन आले, परिणामी चालक राजू माळी याचे गिरणापुला अगोदरच जकात नाक्याजवळ वाहनावरील नियंत्रण सुटले. चालकाचे नियंत्रण सुटून सुसाट आयशर महामार्गावरुन खाली खेालदरीत घरंगळत गेला. चार- पाच वेळा उलट- सुलट झाल्यानंतर ऐंशी फुटावर खोल दरीत पडला. 

दैव बलवत्तर
चालक राजू माळी (रा. पाळधी) याचे स्टेअरींगवरील नियंत्रण सुटताच त्याने संधी पाहून धावत्या ट्रकमधून उडी घेतली. किरकोळ जखमा वगळता तो बालबाल बचावला आहे. घटनेची माहिती मिळताच बांभोरी ग्रामस्थांसह, तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पुलाजवळच आयशर कोसळल्याने येणाऱ्या जाणाऱ्या वाहन धारकांची गर्दी झाली होती. 

ट्रॅक्टरने ओढून काढला ट्रक 
रविवारी सकाळपासून खाली कोसळलेला आयशर बाहेर काढण्यासाठी तब्बल ५ तास प्रयत्न करावे लागले. पेालिस कर्मचारी ज्ञानेश्‍वर कोळीसह बांभोरीतील तरुणांनी ट्रॅक्टर लावून अडकलेला आयशर ओढत आणखी खाली घेवून जात सरळ करण्यात आला. दुपारी देानच्या सुमारास हा आयशर बाहेर काढण्यात यश आले असून पेालिसांत मात्र, याची कुठलीच नोंद नसल्याचे सांगण्यात आले. 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi jalgaon news highway accident eicher truck in overtek