esakal | टपाल पेटी लालच नव्हे तर आहे तीन रंगात; काय आहे त्यांचा अर्थ
sakal

बोलून बातमी शोधा

indian post box

टपाल विभागाच्या लाल, निळा आणि हिरवा अशा तीन रंगातील पेट्या नेमक्‍या कशासाठी याचे कुतूहल अनेकांमध्ये निर्माण करते; तेच येथे जाणून घेता येणार आहे.

टपाल पेटी लालच नव्हे तर आहे तीन रंगात; काय आहे त्यांचा अर्थ

sakal_logo
By
राजेश सोनवणे

जळगाव : पोस्‍ट खात्‍याची टपाल पेटी ग्रामीण भागात अगदी सहजतेने नजरेस पडते. लाल रंगाची पेटी म्‍हटले म्‍हणजे पोस्‍ट कार्ड टाकण्याचे ठिकाण. पण पोस्‍ट कार्यालयाच्या लाल रंगासोबतच हिरवा आणि निळा अशा दोन रंगाच्या पेट्या असतात; हे अनेकांना माहिती नाही. टपाल विभागाच्या लाल, निळा आणि हिरवा अशा तीन रंगातील पेट्या नेमक्‍या कशासाठी याचे कुतूहल अनेकांमध्ये निर्माण करते; तेच येथे जाणून घेता येणार आहे.

शेतकरी असो वा नोकरदार किंवा व्यापारी या सर्वांनासाठीच साधारण १५- २० वर्षांपूर्वी पोस्ट ऑफिस हा एक महत्वाचा घटक होता. पण या पोस्‍ट ऑफिसचा इतिहास खुप मोठा आहे. ९ ऑक्टोबर १८७४ मध्ये स्वित्झर्लंडमधील बर्न येथे ‘युनिव्हर्सल पोस्टल युनियन’ची स्थापना करण्यात आली. ही घटना दळणवळणाची जागतिक क्रांती मानली जाते. या दिवसाची आठवण म्हणून जागतिक टपाल दिन म्‍हणून साजरा करण्यात येत असतो. जगामध्ये पहिल्यांदा टपाल तिकीट सन १८४० मध्ये अस्तित्वात आले. तर भारतात तिकीट सन १८५२ मध्ये अस्तित्वात आले.

लाल पेट्या होत आहेत इतिहासजमा
अनेक ठिकाणी असलेल्या पत्रपेटी यांची स्थिती बिकट झालेली पाहण्यास मिळते. स्‍मार्टफोनच्या जमान्यात टपाल पेटीचा वापर तसा कमी झाला असला तरी आजही सरकारी कार्यालयात तसेच बँकेची कागदपत्रे देवाण-घेवाण करण्यासाठी पत्र पेटीचा वापर होत असतो. पण, अन्य ठिकाणी असलेल्‍या पत्र पेट्यांचे प्रमाण कमी झालेले पाहण्यास मिळते; यामुळे त्या आता इतिहासजमा होण्याच्या मार्गावर असल्‍याचे चित्र सध्या तरी आहे.

भारतातील टपाल खात्‍याचा इतिहास
भारतामध्ये पहिल्या टपाल तिकिटाची सुरुवात सिंध जिल्‍ह्‍यात १८५२ मध्ये झाली. पण भारतामध्ये आधुनिक टपाल यंत्रणेची सुरुवात १ ऑक्टोबर १८५४ मध्ये झाली. १८५४ पर्यंत सगळीकडे एका प्रकारच्या तिकिटांचे प्रचलन सुरू झाले. तर भारतातले पहिले रंगीत तिकीट १९३१ मध्ये उजाडले. पहिले स्वातंत्र्योत्तर तिकीट १९४७ मध्ये निघाले आणि त्यावर भारतीय झेंडा होता. त्यानंतर भारतामध्ये टपाल तिकिटांची रेलचेल झाली. 

टपाल आले ‘ई’ प्रणालीवर
भारतीय डाक विभाग आजच्या घडीला e-post आणि e-bill post, स्पीड पोस्ट, बिजनेस पोस्ट, लॉजिस्टिक पोस्ट, एक्स्प्रेस पार्सल पोस्ट, मीडिया पोस्ट, रिटेल पोस्ट, ग्रीटिंग पोस्ट, स्पीड नेट, इंटरनॅशनल मेल्स आणि इंटरनॅशनल ई.एम.एस. या पोस्टाच्या सेवा चालवत आहे. भारतीय टपाल खात्याचे सगळ्यात जुने आणि खेडोपाडी पोहोचलेले काम म्हणजे आर्थिक सेवांचे अर्थात ‘मनी ऑर्डर’ सेवा. इंटरनॅशनल मनीऑर्डर सेवा, पोस्टाची बचत बँक, इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्स्फर, तात्काळ मनीऑर्डर सेवा आणि डाक बीमा योजना या सेवा देखी टपाल विभागाने सुरू केल्‍या. आज टपाल खाते टपाल सेवेव्यतिरिक्त बँकिंग, विमा, आर्थिक व्यवहारासाठीचे माध्यम झाले आहे. 

लाल पेट्या सर्वत्र पण दोन रंगाच्या पेट्या कुठे?
टपाल खात्‍याची टपाल पेटी म्‍हटली म्‍हणजे लाल रंगाची पेटी सर्वांना आठवते. पण या व्यतिरिक्‍त आणखी दोन रंगाच्या पेट्या आहेत; ज्‍या खुप कमी ठिकाणी नजरेस पडत असतात. अर्थात लाल रंगासोबत असलेल्‍या निळा आणि हिरवा रंगाची पेटी केवळ मुख्य पोस्‍ट कार्यालयाच्या आवारातच पाहण्यास मिळतील. पूर्वी या रंगपेट्यांच्या वरच्या बाजूला लावलेल्या पाट्यांना रंग देण्यात आले होते व बाकी पूर्ण पेटीला लाल रंग होता. 

काय आहे तीन रंगाचा अर्थ
निळा : ही पेटी शहरातील स्थानिक टपालासाठी आहे.
हिरवा : ही पेटी जिल्ह्यातील टपालासाठी आहे.
लाल : ही पेटी रंगाप्रमाणे जलद म्हणजे इतर जिल्ह्यासाठी आहे; जी ग्रामीण भागातही असते.

loading image