सत्तांतर होते अटळ..आकड्याची होती उत्सुकता; ‘ढाई साल बाद’ पुन्हा सेना 

jalgaon corporation
jalgaon corporation

जळगाव : भाजपतील अंतर्गत नाराजी शिवसेनेने हेरली आणि स्थानिक नेतृत्वाच्या मदतीने महापौर आपला कसा होणार, याचे नियोजन केले. भाजपतील बंडखोर सदस्य ठाण्याला रवाना झाले, तेव्हाच सत्तांतर अटळ झाले; उत्सुकता होती ती केवळ फुटलेल्या सदस्यांच्या आकड्याची. तो पडदाही गुरुवारी (ता. १८) पडला, शिवसेना जिंकली आणि कार्यकर्त्यांनी जल्लोष केला... 
रविवार ते गुरुवारपर्यंतच्या घटनाक्रमाचे असे वर्णन करता येईल. रविवारी या नाट्याचा पहिला अंक भाजपतील बंडखोर सदस्यांच्या रवानगीने सुरू झाला. गेल्या तीन-चार दिवसांत त्यात बरेच अंक समाविष्ट झाले आणि या अंकांची अखेर गुरुवारी महापौरपदी शिवसेनेच्या जयश्री महाजन व उपमहापौर म्हणून कुलभूषण पाटील यांच्या निवडीने झाली. 

अशी झाली प्रक्रिया 
महापौर निवडीसाठी गुरुवारी सकाळी अकराला सभेचे कामकाज सुरू झाले. कोविडच्या पार्श्वभूमीवर सभा ऑनलाइन व मतदान व्हीसीद्वारे होणार होते. पीठासीन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी अभिजित राऊत होते. त्यांना सहकार्य करण्यासाठी महापालिका आयुक्त सतीश कुलकर्णी, नगरसचिव सुनील गोराणे उपस्थित होते. 

तीन तास चालली प्रक्रिया 
उमेदवारी अर्जांवरील भाजपची हरकत फेटाळल्यानंतर प्रत्यक्ष निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली. विभागीय आयुक्तांच्या दिशानिर्देशाप्रमाणे सुरवातीला महापौरपदासाठी मतदान घेण्यात आले. साधारण एकच्या सुमारास महापौरपदासाठीचे मतदान पार पडल्यानंतर पीठासीन अधिकाऱ्यांनी जयश्री महाजनांच्या विजयाची घोषणा केली अर्थात, तत्पूर्वीच १७ व्या प्रभागातील सदस्यांचे मतदान आटोपताच शिवसेना कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केला. याच पद्धतीने उपमहापौरपदासाठी मतदान झाले आणि ही प्रक्रिया २.३० ला संपली. विजयी उमेदवारांचे पीठासीन अधिकारी राऊत, आयुक्त कुलकर्णी यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. 
 
मोजकेच सदस्य सभागृहात 
एरवी प्रत्येक वेळी विविध पदाधिकाऱ्यांच्या निवडीचे साक्षीदार असलेले महापालिकेच्या दुसऱ्या मजल्यावरील सभागृह या वेळी गजबजलेले नव्हते. कारण, ऑनलाइन निवडप्रक्रियेने मतदार नगरसेवक आहे त्या ठिकाणी बसून मतदान करू शकणार होते. दोन्ही पक्षांचे प्रतिस्पर्धी उमेदवार, त्यांचे सूचक, अनुमोदक व निवडक नगरसेवक सभागृहात होते. 
 
मतदानाची तीन केंद्रे 
ऑनलाइन मतदान प्रक्रियेत सर्व ७५ सदस्यांनी सहभाग नोंदविला. काही सदस्य सभागृहातच उपस्थित होते. दुसरे केंद्र होते, ठाण्यातील हॉटेल. या हॉटेलमधून शिवसेना, एमआयएम तसेच भाजपतील बंडखोर सदस्यांनी मतदान नोंदविले. भाजपसोबत असलेल्या सदस्यांनी नाशिक जिल्ह्यातील एका हॉटेलमधून मतदान नोंदविले. 
 
शिवसैनिकांचा एकच जल्लोष 
या निवडीनंतर सभागृहाबाहेर व महापालिका इमारतीसमोर जमलेल्या शिवसैनिकांनी एकच जल्लोष केला. ‘आवाज कुणाचा.. शिवसेनेचा, जय भवानी जय शिवाजी’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. फटाक्यांची आतषबाजीही करण्यात आली. 

संपादन ः राजेश सोनवणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com