
कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून म्हणजे एप्रिल २०२० ते जानेवारी २०२१ या दहा महिन्याच्या काळात थकीत वीजबिलापोटी कोणत्याही ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला नव्हता.
जळगाव : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मार्च २०२० मध्ये देशात लॉकडाऊन झाले. या कोरोनाच्या काळात अखंडित व नियमित वीजपुरवठा करून ग्राहकांना घरात राहणे सुसह्य केले. परंतु, कोरोनाच्या दहा महिन्यांच्या कालावधीत खानदेशातील तब्बल २ लाख ६२ हजार ग्राहकांनी फुकटचीच वीज वापरणे पसंत केले. या ग्राहकांकडून एकदा देखील बिलाची रक्कम भरण्यात आली असल्याने थकबाकी १७० कोटींची झाली.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात २३ मार्च २० पासून लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. त्यामुळे ग्राहकांकडे जाऊन वीजमीटरचे रीडिंग घेणे तात्पुरते बंद करण्यात आले. कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून म्हणजे एप्रिल २०२० ते जानेवारी २०२१ या दहा महिन्याच्या काळात थकीत वीजबिलापोटी कोणत्याही ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला नव्हता. एप्रिल ते जानेवारी या दहा महिन्यांच्या काळात खानदेशातील २ लाख ६२ हजार २६३ घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक वर्गवारीतील ग्राहकांनी एकही वीज बिल भरले नाही. त्यांच्याकडे १७० कोटी रुपये थकबाकी आहे.
जळगावातच सर्वाधिक
दहा महिन्यात बिल भरणाऱ्यांमध्ये जळगाव जिल्हा आघाडीवर आहे. जळगाव जिल्ह्यातील १ लाख ४१ हजार १०४ ग्राहक (९२ कोटी थकबाकी), धुळे जिल्ह्यातील ७६ हजार ८३६ ग्राहक (५६ कोटी) व नंदुरबार जिल्ह्यातील ४४ हजार ३२३ ग्राहकांचा (२२ कोटी थकबाकी) समावेश आहे.
थकबाकीदारांना मिळणार दिलासा
महावितरणच्या घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक व इतर (कृषी वगळून) सर्व उच्च व लघुदाब वीजग्राहकांना थकीत व चालू वीजबिलांच्या रकमेचा भरणा करण्यासाठी हप्त्यांची सोय उपलब्ध झाली आहे. यासाठी नवीन योजना तयार करण्यात आली असून आर्थिक अडचणीत असलेल्या थकबाकीदार वीजग्राहकांनी दिलासा देण्यात आला आहे. सोबतच खंडित वीजपुरवठा पुन्हा सुरु करण्याची संधी देण्यात आली आहे. या योजनेमध्ये वीजपुरवठा सुरु असलेल्या ग्राहकांसोबतच तात्पुरता किंवा कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित झालेले, वीजचोरी किंवा न्यायप्रविष्ट प्रकरणातील वीजग्राहकांना सहभागी होता येईल. केवळ दोन टक्के रक्कम भरून या योजनेत सहभागी होता येणार आहे. तरी ग्राहकांनी योजनेचा लाभ घेवून बिल भरणा करण्याचे आवाहन केले आहे.