जळगावच्या मार्केटमध्ये जाताय तर सावध व्हा..परराज्‍यातील टोळी असू शकते तुमच्या अवतीभवती

रईस शेख
Saturday, 9 January 2021

जळगाव शहरातील मार्केटमध्ये नेहमीच गजबज असते. या ठिकाणी बऱ्याचदा पायी चालणे देखील कठीण जाते. अशा गर्दीचा फायदा अनेकजण घेत असतात. यामुळे मार्केटमध्ये जात असाल तर अगदी सावधच रहावे. विशेषतः महिला वर्गाने काळजी घेणे गरजेचे आहे. कारण परप्रांतीय टोळी तुमचे नुकसान करू शकते.

जळगाव : शहरातील फुले मार्केट, गांधी मार्केटसह आठवडेबाजाराच्या गर्दीत महिलांच्या गळ्यातील पोत अलगदपणे तोडणारी टोळी शहरात सक्रिय झाली आहे. गर्दीचा गैरफायदा घेत ब्लेडसारख्या तीक्ष्ण वस्तूने किंवा काहीतरी रसायन टाकून गळ्यात मंगळसूत्र तुटून पडते. दररोज बाजरात अशा घटना घडत असून, चोरटे मात्र पोलिसांना मिळेनासे झाले आहेत. शनिवारी (ता. ९) शिरसोली येथील सरला बारी (वय ४०) या गृहिणीच्या गळ्यातील मंगळसूत्र दाणा बाजारातून अशाच पद्धतीने लांबविण्यात आले. 
शिरसोली येथील सरला बारी या मुलगा पंकजसोबत शनिवारी जळगावला खरेदीसाठी आल्या होत्या. शिरसोली येथून त्या रिक्षाने जळगावात आल्यानंतर दाणा बाजारात खरेदी केली. या ठिकाणी एका दुकानावर अननसही घेतले. त्यानंतर मुलगा पंकज यास नवीन कपडे खरेदी करावयाचे असल्याने ते फुले मार्केटकडे जाण्यासाठी निघाले. चालत असताना सरला बारी यांच्या गळ्यातील मंगळसूत्र जमिनीवर तुटून पडले. मंगळसूत्तामधील तीन ग्रॅमचे डोरले व वाट्या तसेच दोन ग्रॅमचे मणी असा बारा ते १५ हजार रुपयांचा ऐवज गायब झालेला होता. 

सीसीटीव्हीतून झाले स्‍पष्‍ट
कुठेतरी रस्त्यात पडले असावे म्हणून ज्या दुकानावर अननस घेतले त्या ठिकाणीही जाऊन सरला यांच्यासह मुलगा पंकज यांनी मंगळसूत्तामधील डोरल्याबाबत चौकशी केली. कुणीतरी मंगळसूत्र चोरून नेल्याची खात्री झाल्यावर दोघांनी एका दुकानातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. यात एक महिलेच्या हालचाली संशयास्पद असल्याचे दिसून येत आहे. मोबाइलमध्ये सीसीटीव्ही फुटेज घेऊन पंकज याच्यासह त्याची आई सरला या दोघांनी तक्रारीसाठी शहर पोलिस ठाणे गाठले. या ठिकाणी तक्रारीवरून गुन्हा नोंद करण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते. 

परप्रांतीय टोळ्या.. 
फुले मार्केट, गांधी मार्केट, दाणा बाजार, आठवडेबाजार या ठिकाणी गृहिणींची गर्दी असते. याच गर्दीत अगदी आठ- दहा वर्षांच्या लहान मुल-मुली, चोरट्या महिला दिवसभर हिंडत असतात. सलग तीन-चार गुन्हे करून एक-दोन दिवस या टोळ्या जागा बदलतात. नंतर पुन्हा तोच प्रकार. गुन्हे घडल्यावर तक्रार नोंदवून घेणे इतकेच काम पोलिसांना उरले असून, पोलिस ठाण्यासमोरच चोऱ्या होऊ लागल्याने नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढीस लागली आहे. 

संपादन ः राजेश सोनवणे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi jalgaon news market aria robbery case in golden chain