esakal | ‘एलईडी’ पाहणीसाठी महापौरांचे ‘मॉर्निंग वॉक’ 
sakal

बोलून बातमी शोधा

mayor bharti sonawane

शहरात सध्या एलईडी पथदीप बसविण्याचे काम सुरू आहे. शहराला नवीन झळाळी मिळत असून, वीज बचतदेखील होणार आहे. रविवारी सकाळी सहालाच महापौर भारती सोनवणे यांनी मोहाडी रोड परिसरात फेरफटका मारत पाहणी केली.

‘एलईडी’ पाहणीसाठी महापौरांचे ‘मॉर्निंग वॉक’ 

sakal_logo
By
सचिन जोशी

जळगाव : शहरात एलईडी बसविण्याचे काम सुरू असून, गेल्याच आठवड्यात मोहाडी रस्त्यावर एलईडी बसविण्यात आले. रविवारी पहाटे महापौर भारती सोनवणे यांनी एलईडी सुरू आहेत की नाही याची पाहणी केली. या वेळी पायी फिरण्यासाठी आलेल्या नागरिकांशी त्यांनी संवाद साधला. 
शहरात सध्या एलईडी पथदीप बसविण्याचे काम सुरू आहे. शहराला नवीन झळाळी मिळत असून, वीज बचतदेखील होणार आहे. रविवारी सकाळी सहालाच महापौर भारती सोनवणे यांनी मोहाडी रोड परिसरात फेरफटका मारत पाहणी केली. सर्व एलईडी बसविण्याचे काम पूर्ण झाले असून, रस्त्यावर लख्ख प्रकाश पडल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले. 

महिलांशी साधला संवाद
मोहाडी रोड परिसरात सकाळी पायी फिरण्यासाठी आलेल्या महिलांशीदेखील श्रीमती सोनवणे यांनी संवाद साधला. एलईडीमुळे या रस्त्यावर प्रकाश वाढल्याने रस्त्यावर होणाऱ्या सोनसाखळी लंपासच्या प्रकाराला आळा बसणार असून, रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत होणारे गैरप्रकारदेखील रोखले जाणार असल्याने महिलांनी समाधान व्यक्त केले. 

‘अमृत’च्या कामाची तक्रार 
दरम्यान, परिसरात आणि शहरात अमृत योजनेमुळे रस्त्यांची दुरवस्था झालेली असल्याने प्रचंड त्रास सहन करावा लागत असल्याची तक्रार नागरिकांनी महापौरांकडे मांडली. तसेच लवकरात लवकर रस्ते दुरुस्ती करण्याची मागणी केली. रस्ते दुरुस्तीसाठी प्रत्येक प्रभागाचा मक्ता दिलेला असल्याची माहिती महापौरांनी नागरिकांना दिली. 

संपादन ः राजेश सोनवणे