खेळण्यांऐवजी मुलांच्या हाती कचऱ्याची बॅग; कचरा वेचणाऱ्यांमध्ये सर्वाधिक बालके 

देवीदास वाणी
Wednesday, 10 February 2021

‘कचरा वेचणाऱ्या मुला-मुलींच्या सामाजिक, आर्थिक आणि आरोग्यविषयक समस्यांचे अध्ययन’ या विषयावर जळगाव शहरातील तांबापुरा, मेहरूण परिसरातील मुलांवर त्यांनी शोधप्रबंध तयार केला.

जळगाव : शहरीकरणामुळे कचरा व्यवस्थापनाची समस्या निर्माण झाली आहे. कचरा व्यवस्थापन ही भारतातील मेट्रो शहरातही एक गंभीर समस्या म्हणून पुढे आली आहे. कचरा वेचक स्थानिक वातावरणाचे आरोग्य राखण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतात. ही बालके ६ ते १५ वयोगटातील असतात. आरोग्य, शिक्षण, स्वच्छता, कौशल्य विकास, आर्थिक क्रिया या क्षेत्रात कचरा वेचणाऱ्या मुलांच्या समस्या आहेत. याकडे लक्ष देण्याची, या क्षेत्राचे नियमन करण्याची गरज निर्माण झाल्याचा निष्कर्ष लोकसेवक मधुकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालयातील संशोधक मानसी संजय मराठे यांनी लघुशोध प्रबंधात काढला आहे. 

‘कचरा वेचणाऱ्या मुला-मुलींच्या सामाजिक, आर्थिक आणि आरोग्यविषयक समस्यांचे अध्ययन’ या विषयावर जळगाव शहरातील तांबापुरा, मेहरूण परिसरातील मुलांवर त्यांनी शोधप्रबंध तयार केला. त्यासाठी त्यांना समाजकार्य महाविद्यालयाचे प्रा. डॉ. प्रशांत भोसले यांनी मार्गदर्शन केले. प्रभारी प्राचार्य प्रा. डॉ. यशवंत महाजन यांनी लघुशोध प्रबंधासाठी प्रोत्साहन दिले. 
सर्वांत उपेक्षित हे घटक आहेत. बऱ्याचदा गरीब, अतिपरिचित क्षेत्रातील अनधिकृत झोपडपट्ट्यांमध्ये राहतात. कुटुंबाच्या प्राथमिक गरजांची पूर्तता करण्यासाठी ही मुले कचरा वेचतात. ते करताना स्वसंरक्षणाचे साहित्य न वापरता त्यांना निवासित परिस्थितीत काम करावे लागते. त्यामुळे त्यांच्या आरोग्यास धोका निर्माण होतो. सामान्यतः शहरांच्या कचरा व्यवस्थापन यंत्रणेत त्यांना अयोग्य दर्जा मिळतो. या लोकांकडे व्यावसायिक कौशल्य नसते, अशा वेळी ते कचरा वेचणे याकडे उत्पन्नाचा स्रोत म्हणून पाहतात. 

शारीरिक विकासात अडथळे 
वयाच्या पाचव्या-सहाव्या वर्षापासूनच ही मुले कचरा वेचणीस प्रारंभ करतात. सकाळपासून सायंकाळपर्यंत प्लॅस्टिक, बाटल्या धातू (कथिल, लोखंड, पितळ, तांबे, प्लॅस्टिक, रबर, पुठ्ठा, रद्दी) गोळा करतात. नंतर कुटुंबीयांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी विक्री करतात. कचरा वेचण्याने त्यांच्या पूर्ण शारीरिक विकासात अडथळा येतो. इच्छित शिक्षण, करमणुकीच्या संधीत बाधा येते. हे एक प्रकारचे बालकामगार आहेत. हे आर्थिकदृष्ट्या अप्रिय, मानसिकदृष्ट्या विनाशकारी, शारीरिक, नैतिकदृष्ट्या धोकादायक व हानिकारक आहे. ‘युनिसेफ’च्या मते कचरा हा बालकामगारांचा सर्वांत वाईट प्रकार आहे. 

या आहेत समस्या... 
या बालकांना डोकेदुखी, पोटाचे विकार, ताप, त्वचेचे विकार यांसारखे आजार नियमित होतात. आर्थिक परिस्थिती नाजूक असते. दोन वेळचे जेवण मिळेल का याची चिंता त्यांना असते. पैसा मिळविण्याचा सोपा मार्ग म्हणून कचरा वेचण्याच्या व्यवसायात गुंतलेली असतात. ही मुले शिक्षणापासून वंचित असतात. त्यांच्या आशा-आकांक्षा, स्वप्ने, ध्येय यामुळे मातीमोल ठरतात. शाळा आवडत असूनही यांना शाळेत जाता येत नाही. त्यामुळे त्यांच्या निरक्षरतेचे प्रमाण अधिक आहे. त्यांच्याकडे समाज तिरस्काराने पाहतो. वाईट वागणूक त्यांना दिली जाते. मुलांची हेटाळणी होते. यामुळे मुलांच्या मनावर वाईट परिणाम होतो. व्यसनासारख्या वाईट सवयीमध्ये गुंतलेली दिसतात. 

अशी आहे स्थिती (तांबापुरा परिसर) 
कचरा वेचणारी मुले--५५ टक्के 
रोजचे पन्नास रुपये उत्पन्न मिळणारे--५२.५ टक्के 
कुटुंबाला उत्पन्न मिळवून देणारे--९५ टक्के 
कचरा वेचण्यासाठी दबाव आलेली--४२.५ टक्के 
कचरा वेचल्यानंतर अंघोळ न करणारे-१५ टक्के 
आजारपण येणारे--९० टक्के 
सरकारी रुग्णालयात उपचार घेणारे--९० टक्के 
शिक्षण सोडलेले-१७.५ टक्के 
नियमित अभ्यास न करणारे--७७.५ टक्के 
निरक्षतेचे प्रमाण--८२.५ टक्के 

संपादन ः राजेश सोनवणे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi jalgaon news most children among garbage sellers