घरकुलापासून वंचित ठेवल्यास कारवाई; आमदारांनी दिला इशारा 

gharkul
gharkul

मुक्ताईनगर (जळगाव) : नागरिकांना घरकुल योजनेपासून वंचित ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असा इशारा मुक्ताईनगर तहसील कार्यालयात आढावा बैठकीत आमदार चंद्रकांत पाटील यांनी दिला. 
तहसील कार्यालयातील सभागृहात आमदार पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत नगराध्यक्षा नजमा तडवी, शिवसेना तालुकाप्रमुख छोटू भोई, विधानसभा क्षेत्रप्रमुख सुनील पाटील, तहसीलदार श्वेता संचेती, मुख्याधिकारी अश्विनी गायकवाड, प्रभारी पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड, सार्वजनिक विभागाचे कार्यकारी अभियंता आय. बी. शेख, नायब तहसीलदार प्रदीप झांबरे आदींसह तालुक्यातील इतर ग्रामसेवकांची उपस्थिती होती. 
बैठकीत शबरी, रमाई व पंतप्रधान आवास तसेच इतर आवास घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना लाभापासून वंचित राहिलेल्या लाभार्थींच्या प्रस्तावाबाबत सविस्तर माहिती जाणून घेतली. तसेच लाभार्थ्यांना घरकुल योजनेपासून वंचित ठेवण्याचा प्रकार समोर आल्यास कारवाईला सामोरे जा, असा सज्जड इशारा आमदार पाटील यांनी दिला. 

जागा नसलेल्‍यांना मिळणार जागा
शासनाचे २०१८ च्या परिपत्रकानुसार २०११ पूर्वीचे रहिवासी अतिक्रमण हे नियमकुल करण्याबाबत शासन विचाराधीन आहे. ज्यांच्याकडे घरकुल बांधण्यासाठी जागा उपलब्ध नाही, त्यांना जागा उपलब्ध करून देण्यासंदर्भात आढावा घेण्यात आला. मध्यंतरी प्रशासकीय काळात नगरपंचायत प्रशासनाने शहरातील २२०० रहिवासी अतिक्रमणधारकांना आपले अतिक्रमण का काढण्यात येऊ नये, अशी नोटीस दिली होती. पुढे ही जागा अतिक्रमणधारकांच्या नावे लागणेसाठी आपण काय कारवाई केली, असा प्रतिप्रश्न मुख्याधिकारी गायकवाड यांना आमदार पाटील यांनी केला, तसेच काही केले नसेल तर शहरातील शंभर टक्के रहिवासी अतिक्रमणधारकांच्या जागा नियमाकुल करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे पत्रव्यवहार करा, असे सांगत नगरपंचायत मुख्याधिकारी तसेच ग्रामसेवकांना यासंदर्भात सूचना करण्यात आली. 

उपस्‍थित नसलेल्‍या ग्रामसेवकांना नोटीस
बैठकीला उपस्थित नसलेल्या ग्रामसेवकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात यावी, तसेच घरकुल योजना व शासन परिपरिपत्रक असल्यावरही अतिक्रमण धारकांच्या जागा नियमाकुल होत नसतील व लाभार्थ्यांना यामुळे घरकुल योजनेपासून वंचित राहावे लागत असेल तर कोणत्या स्वरूपाचे कामकाज सुरू आहे, अशी संतप्त भावना व्यक्त करीत तहसीलदार म्हणून आपला अंकुश असणे गरजेचे आहे, अशा सूचना आमदार पाटील यांनी केल्या. चौदाव्या वित्त आयोगातून ग्रामपंचायतीने काय खर्च केला. तसेच खर्च केला नसेल तर ग्रामसेवकांवर कारवाई होऊ शकते, असा इशारा देण्यात आला. 

यात्रोत्सवाची पूर्वतयारी करा 
तीर्थक्षेत्र श्री संत मुक्ताई येथे विजया एकादशी ते महाशिवरात्री म्हणजे ९ ते ११ मार्च या काळात भव्य यात्रोत्सव असतो. परंतु यंदा २८ फेब्रुवारीपर्यंत लॉकडाउनची नियमावली आहे. त्यानंतर काय आदेश होतील, ते सांगता येत नाही. मात्र, संभाव्य यात्रोत्सवाचे नियोजन आतापासून व्हायला हवे, अशा सूचना आमदार पाटील यांनी तहसीलदारांना केल्या. 

संपादन ः राजेश सोनवणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com