esakal | रात्रीच्या संचारबंदीत शहरात ते मात्र सुसाट 
sakal

बोलून बातमी शोधा

night curfew

महापालिका हद्दीत रात्री अकरानंतर संचारबंदी लागू करण्यात आली आहे. रात्री अकरानंतर केवळ पोलिस रस्त्यावर असताना शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत सलग घरफेाड्या, चोरीचे गुन्हे वाढले आहे.

रात्रीच्या संचारबंदीत शहरात ते मात्र सुसाट 

sakal_logo
By
रईस शेख

जळगाव : महापालिका हद्दीत रात्री अकरानंतर संचारबंदी लागू करण्यात आली आहे. रात्री अकरानंतर केवळ पोलिस रस्त्यावर असताना शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत सलग घरफेाड्या, चोरीचे गुन्हे वाढले आहे. एकाच रात्रीतून तीन ते चार ठिकाणी चोऱ्यांचे गुन्हे घडत असून, चारही गुन्ह्यांची एकाच तक्रारीत ‘कालामोड’ एफआयआर घेण्याचा पायंडा शहर पेालिसांनी पाडला आहे. 
पोलिस ठाण्याशेजारीच केळकर मार्केटच्या बाबा गारमेंटची दोन दुकाने, बळिराम पेठेतील घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी चक्क गव्हाचे पोते लांबविले. तसेच एका मंदिरात चोरीचाही प्रयत्न केला. 

तीन घटना 
शहर पोलिस ठाण्याशेजारील केळकर मार्केटमध्ये मनोजकुमार हुकूमचंद दुग्गड (वय ५२, रा. गणेश कॉलनी) यांचे होजिअरीचे दुकान आहे. याच दुकानाशेजारी दुकान क्र. ८ प्रदीप लालचंद कटारिया (रा. सिंधी कॉलनी) यांचे ‘बाबा गारमेंट’ आहे. शनिवारी (ता. २६) रात्री नेहमीप्रमाणे आठच्या सुमारास दोघेही दुकाने बंद करून घरी गेले. रविवारी सकाळी आठच्या सुमारास दुग्गड त्यांचा भाचा आनंदकुमार घिया यांच्यासह दुकानावर आले असता दुकानाला कुलूप दिसून आले नाही. बाजूच्या ‘बाबा गारमेंट’ या दुकानालाही कुलूप नव्हते. दुग्गड यांनी ‘बाबा गारमेंट’चे प्रदीप कटारिया यांना फोन लावून प्रकाराची माहिती दिली. कटारियाही दुकानावर आले. दुकानात पाहणी केली असता दुग्गड यांच्या दुकानातील रोकड असलेले ड्रॉवर तोडून त्यातील नऊ हजारांची रोकड चोरट्यांनी लांबविल्याचे दिसून आले. तर कटारिया यांच्या दुकानातील सामान अस्ताव्यस्त पडलेले होते, तर त्यांच्याही दुकानातून ६०० रुपयांची रोकड चोरट्यांनी लांबविली. 

गव्हाचे पोते लंपास 
याचवेळी चोरट्यांनी बळिराम पेठेतील स्वप्नील अपार्टमेंटमधील रहिवासी व जनता बँकचे कर्मचारी विजय देशमुख यांच्या घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून घरातील ३० किलो गव्हाचे पोते, दोन होम थिएटर असा ऐवज लांबविला असल्याचेही समोर आले. तसेच बळिराम पेठेतील दत्तमंदिराच्या दानपेटीचे कुलूप तोडण्याचाही चोरट्यांनी प्रयत्न केला. 

चोरटे सीसीटीव्हीत कैद 
केळकर मार्केटमधील दुकानाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरटे कैद झाले असून, पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. या सर्व घटनांप्रकरणी मनोजकुमार दुग्गड यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. उमेश भांडारकर अधिक तपास करीत आहेत. 

संपादन ः राजेश सोनवणे