कुलगूरूंचा राजीनामा केवळ राज्‍य शासनाचा वाढलेला हस्‍तक्षेपामुळे! 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 1 March 2021

राजकीय हस्तक्षेपाला कंटाळून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ व डॉ़. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठातील कुलगुरूंनी तडकाफडकी राजीनामा दिला. 

जळगाव : कवियित्री बहिणाबाई चौधरी उत्‍तर महाराष्‍ट्र विद्यापीठाचे कुलगूरू डॉ. पी. पी. पाटील यांनी राजीनामा देणे म्‍हणजे शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडविणारी आणि दुर्देवी घटना आहे. यास केवळ राज्‍य शासनाचा मागील वर्षभरात वाढलेला हस्‍तक्षेप आणि दबाव कारणीभूत असल्‍याचा आरोप विद्यापीठ विकास मंचचे विभाग प्रमुख तथा सिनेट सदस्‍य नितीन ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत केला. 
विद्यापीठ विकास मंचतर्फे आयोजित पत्रपरिषदेस सिनेट सदस्य राजेंद्र नन्नवरे, अभाविपचे प्रदेशमंत्री सिध्देश्वर लटपटे, मनिषा चौधरी, दिनेश नाईक, अमोल मराठे आदी उपस्थित होते़. ठाकूर यांनी सांगितले, की महाविकास आघाडी सरकार आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री यांच्या राजकीय हस्तक्षेपाला कंटाळून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ व डॉ़. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठातील कुलगुरूंनी तडकाफडकी राजीनामा दिला. 

विद्यापीठ स्‍वायत्‍ततेवर गदा
महाविकास आघाडी सरकारने एकप्रकारे विद्यापीठ स्‍वायत्‍ततेवर गदा आणण्याचे काम केले आहे. वर्षभरापासून राज्य शासन विद्यापीठाच्या कामकाजात हस्तक्षेप करीत आहे. इतकेच नाही तर विद्यापीठाकडे शिल्लक निधी शासनाकडे वर्ग करण्याचा आग्रह, परीक्षा घ्याव्यात की नाही, कुलसचिव नियुक्ती संदर्भात केलेला आक्षेप व त्यानंतर न्यायालयाने राज्य शासनाला दिलेली चपराक हे ताजे असतानाच राज्यातील दोन विद्यापीठांच्या कुलगुरूंनी राजकीय हस्तक्षेपाला कंटाळून राजीनामा देणे हे शिक्षण क्षेत्रातील दुर्देवी बाब आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi jalgaon news north maharashtra university vice chancellor resigned