पुन्हा ऑनलाईन फसवणूक; वाहन खरेदीत ५८ हजाराचा गंडा

रईस शेख
Friday, 15 January 2021

ऑनलाइन खरेदी-विक्री साइट ओएलएक्सवर सर्च करत होता. सोमवारी (ता. ११) ओएलक्सवर एक दुचाकी आवडल्याने त्याने दिलेल्या मोबाईलवर संपर्क साधला. दुचाकीचे कागदपत्र मागविले, व्हॉट्सॲपवर कागदपत्रे पाठविली,

जळगाव : ओएलएक्सवरून दुचाकी घेण्याचे आमिष दाखवत पेटीएमच्या माध्यमातून अनोळखी व्यक्तीने शनी पेठ हद्दीतील हरिओमनगरातील तरुणाला ५८ हजार रुपयांचा ऑनलाइन गंडा घातल्याची घटना बुधवारी (ता. १३) सायंकाळी घडली. शनी पेठ पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल आहे. 
हरिओमनगर शनिपेठेतील योगेश तायडे (वय २२) मेडिकलवर काम करून आपल्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाह चालवितो. मेडिकलवर येण्या-जाण्यासाठी त्याला दुचाकीची गरज होती. परिणामी तो ऑनलाइन खरेदी-विक्री साइट ओएलएक्सवर सर्च करत होता. सोमवारी (ता. ११) ओएलक्सवर एक दुचाकी आवडल्याने त्याने दिलेल्या मोबाईलवर संपर्क साधला. दुचाकीचे कागदपत्र मागविले, व्हॉट्सॲपवर कागदपत्रे पाठविली, अनोळखी व्यक्तीने पाठविलेली कागदपत्रे पाहून योगशचा विश्वास बसला, दुचाकीची रक्कम २२ हजार रुपयांत ठरली व तत्काळ दोन हजार १५० रूपये पेटीएमने पाठविले. 

...अन्‌ फसवणूक 
समोरील व्यक्तीने मी इंडियन आर्मी पोस्ट ऑफिसमधून बोलत असल्याची बतावणी करून पैसे पाठविल्याशिवाय गाडी मिळणार नाही, असे सांगितल्यावर पाच हजार रुपये दोन वेळा, नऊ हजार १५० दुसऱ्यांदा, नऊ हजार १०० तिसऱ्यांदा पाठविले, तरीदेखील गाडी मिळाली नाही. पुन्हा त्याच व्यक्तीचा फोन आला आणि ११ हजार ९९९ रुपये ऑनलाइन तत्काळ पाठवा, गाडी तुम्हाला ताब्यात मिळून जाईल, असे सांगितल्यावर आपली फसवणूक होत असल्याचे योगेशला समजले. त्याने तातडीन शनी पेठ पोलिस ठाण्यात धाव घेतली. योगेश तायडेच्या फिर्यादीवरून ५८ हजार ३७३ रुपयांची फसवणूक झाल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.  

संपादन ः राजेश सोनवणे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi jalgaon news online fraud in olx on vehicle sell