ग्रामपंचायती बिनविरोधसाठी वेगळी ऑफर..प्रतिसदस्य तीन लाखांचा निधी 

चंद्रकांत चौधरी
Monday, 21 December 2020

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांनी भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आघाडीच्या माध्यमातूनच उमेदवार निश्चित करून निवडणूक लढवावी, कोणत्याही परिस्थितीत भाजपशी हातमिळवणी अथवा युती करू नये,

पाचोरा (जळगाव) : तालुक्यातील ९६ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत असून, ग्रामस्थांनी निवडणुका बिनविरोध करण्यासाठी एकत्रित यावे, बिनविरोध होणाऱ्या ग्रामपंचायतींना प्रतिसदस्य तीन लाखांचा निधी विकासासाठी प्राधान्याने देणार असल्याची माहिती आमदार किशोर पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. 
ग्रामपंचायत निवडणुकांसंदर्भात रविवारी (ता. २०) सायंकाळी आमदार किशोर पाटील यांनी शिवालय या आपल्या संपर्क कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. या वेळी जिल्हा परिषद सदस्य रावसाहेब पाटील, विकास पाटील, संजय पाटील (भुरा आप्पा) दीपकसिंह राजपूत, शेतकरी सेनेचे अरुण पाटील, ॲड. अभय पाटील, उपजिल्हाप्रमुख गणेश पाटील, डॉ. भरत पाटील, जे. के. पाटील, किशोर बारावकर, राजेश पाटील आदी उपस्थित होते. 

भाजपशी हातमिळवणी नको
आमदार किशोर पाटील यांनी स्पष्ट केले, की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांनी भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आघाडीच्या माध्यमातूनच उमेदवार निश्चित करून निवडणूक लढवावी, कोणत्याही परिस्थितीत भाजपशी हातमिळवणी अथवा युती करू नये, असे आदेश दिल्याचे सांगून नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत शिक्षक व पदवीधर या सुशिक्षित मतदारसंघातील मतदारांनी भाजपला सत्तेपासून दूर ठेवले आहे. यावरूनच भाजपसंदर्भातील लोकभावना स्पष्ट झाल्या आहेत. कायदे शेतकरी हितास बाधक असतील, तर ते बदलण्याची जबाबदारी सरकारची असते, याचेही भान केंद्रातील भाजप सरकारला राहिलेले नाही. त्यामुळे केंद्र सरकारच्या विरोधात प्रचंड जनक्षोभ वाढला आहे. 
आता प्रत्येक निवडणुकीचा पाया असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये भाजपला धडा शिकवण्याची संधी चालून आली असून, या संधीचे सोने करावे. महाविकास आघाडीच्या माध्यमातून एकत्रित येऊन ग्रामपंचायतीवर आपले वर्चस्व प्रस्थापित करून भाजपला सत्तेसाठी दूर ठेवावे. 

कायदा सुव्यवस्था राखा 
जास्तीत जास्त प्रमाणात बिनविरोध निवडणुकीवर भर द्यावा. जेथे ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध होईल, तेथे प्रतिसदस्य तीन लाख रुपयांचा निधी विकास कामांसाठी दिला जाईल. सात सदस्य असलेल्या ग्रामपंचायतीला २१ लाख, नऊ सदस्य असलेल्या ग्रामपंचायतीला २७ लाख, ११ सदस्य असलेल्या ग्रामपंचायतीला ३३ लाख अशा प्रकारचा निधी आमदार फंडातून अथवा इतर दुसऱ्या हेडखाली देण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही आमदार किशोर पाटील यांनी दिली. एक सदस्य जरी बिनविरोध झाला तरी त्या सदस्याला तीन लाखांचा निधी देऊन त्याच्या प्रभागात विकासकामांना प्राधान्य देण्याचा प्रयत्न असेल, असे आश्वासन त्यांनी दिले. गावातील व भाऊबंदकीतील एकी तसेच शांतता व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी बिनविरोध निवडीवर भर द्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi jalgaon news pachora gram panchayat election mla kishor patil