भुसावळला राजकारणाने बदलली कूस; चार वर्ष भाजपचे आता राष्ट्रवादीला सुगीचे दिवस

ncp
ncp

भुसावळ (जळगाव) : बदल हा सृष्टीप्रमाणेच समाजरचना आणि समाजव्यवस्थेचा स्थायी भाव आहे, हे त्रिवार सत्य आहे. आजचे संदर्भ उद्या बदललेले असतात. याच न्यायाने एकीकडे पाकिकेत माजी आमदार संतोष चौधरी यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीची १५ वर्षे असलेली सत्ता माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या नेतृत्वाखाली उलथवून लावत गेल्या चार वर्षांपासून भाजपने एकहाती सत्ता गाजविली खरी, मात्र अवघ्या चारच वर्षांत राजकारणाचे फासे असे पालटले, की याच भाजपमधील नगरसेवकांनी आता खडसेंच्या नेतृत्वात राष्ट्रवादीत प्रवेश केला असून, भुसावळ पालिकेत पुन्हा राष्ट्रवादीला सुगीचे दिवस येतील. आगामी काळात पालिका निवडणूक होऊ घातली असून, पालिकेत असलेली भाजपची सत्ता टिकवून ठेवण्यासाठी आमदार संजय सावकारे यांच्या नेतृत्वाची कसोटी लागणार आहे. 
भुसावळच्या राजकारणावर नेहमीच जिल्ह्याचे लक्ष राहिले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांनी या ठिकाणी आपले वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. याठिकाणी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांना मानणारा मोठा वर्ग भुसावळ शहर आणि तालुक्यात असून, यांच्या नेतृत्वात भुसावळ पालिकेत भाजपने सत्ता स्थापन केली तर विधानसभा निवडणुकीत देखील भाजपचे आमदार निवडून आले. यापूर्वी माजी आमदार संतोष चौधरी यांनी भुसावळ नगरपालिकेवर पंधरा वर्षे एक हाती कारभार चालविला होता. मात्र कालांतराने माजी आमदार चौधरी आणि आमदार संजय सावकारे यांच्यात वितुष्ट निर्माण होऊन आमदार सावकारे यांनी वेगळी वाट धरली. त्यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या काही नगरसेवकांनी वेगळा गट स्थापन करून भाजपच्या गोटात सामील झाले होते. त्यामुळे पालिकेतील भाजपचे बळ वाढून गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत भाजपला मोठे यश मिळवता आले. 

चार वर्षात चित्र पालटले
खडसे आणि सावकारे यांच्या नेतृत्वाखाली भाजपने सत्ता स्थापन केली होती. मात्र, गेल्या चार वर्षांत राजकारणाचे चित्र पालटले असून, माजी मंत्री खडसे यांनी भाजपला रामराम ठोकत राष्ट्रवादीत प्रवेश घेतला आहे. त्यामुळे त्यांचे समर्थक असलेल्या नगरसेवकांनी देखील जळगाव येथे झालेल्या मेळाव्यात राष्ट्रवादीत प्रवेश घेतला. भुसावळमधील तब्बल ५३ पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. यात भाजप जिल्हा संघटन सरचिटणीस प्रा. सुनील नेवे यांच्यासह प्रवेश करणाऱ्यांमध्ये १२ माजी नगरसेवकांसह सात नगरसेविका पतींचा समावेश आहे. 

सावकारे समर्थक भाजपतच 
भुसावळ पालिकेत भाजपची एक हाती सत्ता असली तरी सत्ताधारी भाजपत खडसे आणि आमदार सावकारे समर्थक दोन गट आहेत. याची प्रचिती देखील वारंवार पाहावयास आली होती. सध्या राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या पदाधिकाऱ्यांमध्ये खडसे समर्थकच आहेत. तर आमदार सावकारे यांचे कट्टर समर्थक असलेल्या नगरसेवक किंवा त्यांच्या परिवारातील कुणीही राष्ट्रवादीत प्रवेश केलेला नाही हे विशेष. त्यामुळे आगामी काळात आमदार सावकारे यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ते भाजपत राहिले तर, आमदार सावकारे यांना भाजपची पुन्हा नव्याने मोट बांधून आगामी पालिका निवडणुकीत सत्ता कायम राखण्याचे त्यांच्यापुढे आव्हान आहे. 

खडसे, चौधरी वादाची चिन्हे 
माजी आमदार संतोष चौधरी आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्यात विळा भोपळ्याचे नाते आहे. याची कबुली खुद्द श्री. खडसे यांनी शुक्रवारी (ता. १२) भुसावळला झालेल्या राष्ट्रवादीच्या मेळाव्यात देत जुने वाद विसरून पक्ष संघटनासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले होते तर आता आज (ता.१३) भाजप नगरसेवकांनी देखील राष्ट्रवादीत प्रवेश केला असून, आगामी पालिका निवडणुकीत उमेदवारी देताना खडसे समर्थक आणि चौधरी समर्थक असा नवीन वाद उभा राहण्याची चिन्हे दिसत आहे. 

मेळाव्यातच गटबाजीचे दर्शन 
राष्ट्रवादीच्या परिवार संवाद अभियानानिमित्त शुक्रवारी भुसावळ शहरात प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मेळावा पार पडला. यावेळी वरणगावातील काही भाजप पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. मात्र, भुसावळच्या पदाधिकाऱ्यांनी माजी आमदार चौधरी यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमात प्रवेश न घेता, जळगाव येथे झालेल्या मेळाव्यात प्रवेश करणे पसंत केले. तसेच जलसंपदा मंत्र्यांच्या स्वागतासाठी राष्ट्रवादीतर्फे सचिन चौधरी यांनी लावलेला होर्डिंग्जवर एकनाथराव खडसे यांचे छायाचित्र वगळण्यात आल्याने नाराजी व्यक्त केली जात होती. त्यामुळे यातूनच गटबाजीचे उघडपणे दर्शन घडून आले. 

संपादन ः राजेश सोनवणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com